1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: मंगळवार, 2 ऑगस्ट 2016 (15:31 IST)

हृदयरुग्णांसाठी राईस ब्रॅन ऑईल

भारतात भुईमूग, सोयाबीन, मोहरी आणि खोबरेल तेलाचे सेवन सर्वश्रूत आहे. या तेलांचे आरोग्याच्या दृष्टीने कमी अधिक फायदे आहेत. आतापर्यंत खाद्यतेलाची निवड त्यांच्या किंमतीवर केली जायची, परंतु हृदयरुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खाद्यतेल निवडीबाबत ग्राहक आता चोखंदळ झाले आहेत. नवीन संशोधनानुसार सर्वाधिक निरोगी आणि हृदयाच्या आरोग्याला उपयुक्त खाद्य तेल म्हणून राइस ब्रॅन ऑईल ओळखले जाते. हे तेल भाताच्या कोंड्यापासून तयार केले जाते. अमेरिकेत तसेच अनेक आशियाई देशांमध्ये निरोगी तेल म्हणून राईस ब्रॅन विकले जाते. कोलेस्टेरॉलची पातळी योग्य तितकी राखण्यासाठी आणि हृदयविकार व अन्य आजार रोखण्यासाठी या खाद्यतेलाचा वापर जागतिक आरोग्य संघटनेनेही सुचवला आहे. 
 
आरोग्यविषयक वाढत्या जागरुकतेमुळे लोक ऑलिव्ह ऑईल आणि कॅनोला तेलाला पसंती देताना दिसतात. परंतु या महागड्या आणि आयात होणार्‍या ऑलिव्ह आणि कॅनोला ऑइलला किफायती भारतीय पर्याय म्हणून राईस ब्रॅन ऑइल हळूहळू लोकांच्या पसंतीस उतरत आहे. भाताच्या उत्पादनात जगात चीनपाठोपाठ भारत हा दुसरा मोठा देश असला तरी सध्या सुमार 10 लाख टन इतकेच राईस ब्रॅन तेल उत्पादित होते तर भारतातील वार्षिक खाद्यतेलाचा उपभोग हा एक कोटी 20 लाख टन असून त्या तुलनेत उत्पादित राईस ब्रॅन तेलाचे प्रमाण जेमतेम पाच टक्के आहे. भारतात भाताच्या कोंड्याची प्रचंड उपलब्धता असली तरी हा भात कोंडा वीट भट्ट्यांमध्ये जळणासाठी आणि पशुखाद्य म्हणूनच वाया घालवला जातो. सध्या देशात अदानी विल्मर, मॅरिको, राईसेला यासह विविध नऊ उत्पादकांचे राईस ब्रॅन तेलाचे ब्रँड्स उपलब्ध आहेत. हे तेल आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहेच, पण त्यासोबत स्वयंपाकाच्या दृष्टीनेही उपयुक्त आहे. कारण 217 अंश सेल्सियस तापमानापर्यंत तापलेल्या राईस ब्रॅन तेलात नैसर्गिक पोषणमूल्ये आणि अँटी ऑक्सिडंट्सचे प्रमाण अबाधित राहते. त्यामुळे या तेला‍वर ‍ प्रक्रिया करून तयार होणार्‍या पदार्थांमध्ये पोषणमूल्यं कायम राहतात.