सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 2 ऑगस्ट 2023 (15:10 IST)

डेंग्यू लक्षणं, निदान, उपचार: पावसाळ्यात डास चावल्यामुळे होणारा हा आजार काय आहे?

पावसाळा येताच विविध साथीच्या रोगांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यात डेंग्यूच्या साथीचादेखील समावेश असतो. महाराष्ट्रातही दरवर्षी डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असतात. यंदाही तेच चित्र पाहायला मिळत आहे.
 
अशात हा आजार नेमका काय आहे? तो कसा होतो आणि त्यापासून बचाव कसा करायचा? समजून घेऊयात.
 
1.डेंग्यू म्हणजे नेमकं काय?
डेंग्यू हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार आहे. प्रामुख्यानं डासांची एडिस इजिप्ती ही प्रजाती डेंग्यू पसरवण्यास कारणीभूत असते.
 
डेंग्यू किंवा डेंगी - हा शब्द आलाय स्वाहिली भाषेतल्या 'Ka-dinga pepo' या शब्दांवरून. याचा अर्थच होतो cramp-like seizure म्हणजे पिळवटून दुखणं.
 
डेंग्यूला Bonebreak Fever अर्थात हाडं मोडून काढणारा ताप असंही म्हटलं जातं. या तापामुळं काही जणांना हाडं आणि स्नायूत खूप दुखतं. डेंग्यूचं निदान NS1,IgM आणि IgG या रक्ताच्या तीन चाचण्या करून होतं.
 
2.डेंग्यूची प्रमुख लक्षणं काय?
डेंग्यूच्या तापाचे दोन प्रकार आहेत - Dengue Fever DF आणि Dengue Hemorrhagic Fever DHF.
 
पहिल्या स्थितीत रुग्णाला अचानक थंडी वाजून ताप येतो. याशिवाय डोकेदुखी, अंगदुखी, हाडं आणि सांध्यांमध्ये वेदना होणं, मळमळ, अंगावर सूज आणि चट्टे येणं, अशी लक्षणं दिसू शकतात.
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार डासाने चावा घेतल्यानंतर 4 ते 10 दिवसांत लक्षणं दिसू लागतात आणि 2 ते 7 दिवसांपर्यंत असतात.
 
दुसऱ्या प्रकारच्या तापामुळे अर्थात DHFमुळे तापासोबतच रक्तस्राव होऊन रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. सुरुवातीला ताप आणि अंगदुखी होतेच, त्याशिवाय शरीरावर पुरळ, नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्राव, मळमळ, उलटी आणि लघवीतून रक्त बाहेर पडणं, सतत तहान लागणं आणि अशक्तपणा, अशी लक्षणं दिसू शकतात.
 
अशा गंभीर स्थितीत रुग्णाच्या मेंदू, फुप्फुसं किंवा किडनीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तातडीने उपचारांची गरज असते.
 
3.डेंग्यूवर उपचार काय?
डेंग्यूवर ठराविक असे उपचार किंवा औषध उपलब्ध नाही. पण लवकर निदान झाल्यास आणि वेळीच उपचार मिळाल्यास यावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं, असं IMA महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे सांगतात.
 
रुग्णाला त्याच्या लक्षणांनुसार म्हणजे ताप किंवा अंगदुखी पाहून तशी औषधं दिली जातात. जर प्रकृती गंभीर असेल तर रुग्णालयात भरती करावं लागू शकतं.
 
डॉ. भोंडवे सांगतात की "डेंग्यूच्या रुग्णाला विश्रांतीची सर्वांत जास्त गरज असते. तसंच भरपूर पाणी पिण्याचीही, म्हणजे अंदाजे दिवसाला तीन लीटर पाणी प्यायला हवं. तसंच रुग्णानं साधा आहार घ्यावा," असंही ते सांगतात.
डेंग्यू तापामुळे शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी होते. साधारणपणे एक घन मिलीलीटर रक्तात 1.5 लाख ते 4.5 लाख प्लेटलेट्स असणं गरजेचं असतं. पण डेंग्यूमध्ये या प्रमाणावर सतत लक्ष ठेवावं लागतं.
 
जर प्लेटलेट्सचं प्रमाण 10 हजारांच्या खाली गेलं तर रुग्णाला बाहेरून प्लेटलेट्स द्यावे लागतात, असं डॉ. भोंडवे सांगतात. साधारणपणे डेंग्यूचा रुग्ण 3 ते 8 दिवसांत बरा होतो.
 
4.डेंग्यू होऊ नये म्हणून काय करावं?
डेंग्यू पसरवणाऱ्या अळ्या किंवा एडिस इजिप्ती प्रजातीचे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात तयार होतात. त्यामुळं घरात एसी, फ्रीजखाली साचलेलं पाणी, फुलदाण्या, कूलर, कुंड्या, बादल्या, जुने टायर यांच्याकडे विशेष लक्ष ठेवा. तिथे खूप दिवस पाणी जमा होणार नाही, याची काळजी घ्या.
 
घरात आणि आजूबाजूला स्वच्छता पाळणं सर्वांत महत्त्वाचं. डेंग्यूचे डास सामान्यतः दिवसाच चावतात, त्यामुळे तुमच्या आजूबाजूला पाणी साचलेल्या ठिकाणी जाणं टाळावच. घरांच्या खिडक्यांना जाळी लावणे, शक्यतो दारं-खिडक्या बंद ठेवणे, आणि खूप डास असल्यास त्यांची विल्हेवाट लावायला उपाययोजना करणे आवश्यक आहे.
 
डॉ. भोंडवे सांगतात की डेंग्यूच्या विषाणूचे 1, 2, 3, 4 असे चार प्रकार आहेत. त्यामुळं तुम्हाला एकदा डेंग्यू होऊन गेला तरीही तो पुन्हा होऊच शकतो.
WHOच्या आकडेवारीनुसार दरवर्षी 39 कोटी लोकांना डेंग्यूची लागण होत असावी असा अंदाज आहे. जगभरात डेंग्यूमुळे दरवर्षी सुमारे 25 हजार मृत्यू होतात. आणि यापैकी 70 टक्के रुग्ण आशियातले असतात.
 
हे प्रमाण मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा कमी असलं, तरीही हे आजारपणाचं एक मोठं कारण आहे, एक मोठी समस्या आहे, असं जागतिक डास कार्यक्रमाचे प्राध्यापक कॅमरॉन सिमन्स सांगतात.
 
त्यामुळे तुम्हीसुद्धा काळजी घ्या. ही बातमी जरूर शेअर करा जेणेकरून इतरांनाही ही महत्त्वाची माहिती कळेल.



Published By- Priya Dixit