सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 19 मे 2022 (15:09 IST)

वजन कमी करणारी लायपोसक्शन शस्त्रक्रिया काय असते?

Weight Loss
21 वर्षीय कन्नड अभिनेत्री चेतना राजचा सोमवारी (16 मे 2022) बंगळुरूतील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.
 
वजन कमी करण्यासाठी चेतना राजने सोमवारी बंगळुरूच्या कॉस्मेटिक सेंटरमध्ये 'लायपोसक्शन' शस्त्रक्रिया केली होती. यानंतर तिची तब्येत खालावली गेली.
 
चेतनाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी कॉस्मेटिक सेंटरवर निष्काळजीपणाचा आरोप केलाय. याबाबत चौकशी सुरू करण्यात आलीये, असं बंगळुरूचे (नॉर्थ) पोलीस उपायुक्त अविनाश पाटील म्हणाले.
 
वाढलेलं वजन कमी करण्यासाठीची 'लायपोसक्शन' शस्त्रक्रिया आहे तरी काय? ही शस्त्रक्रिया कोणावर करतात? हे ऑपरेशन धोकादायक आहे? आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
चेतना राजचा मृत्यू कसा झाला?
माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार, चेतना राजने वजन कमी करण्यासाठी कॉस्मेटिक सेंटरमध्ये 'लायपोसक्शन' शस्त्रक्रिया केली होती. पण, शस्त्रक्रियेनंतर अचानक तिची तब्येत खालावली. तिला बंगळुरूतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल करताना तिच्या फुफ्फुसात पाणी झालं होतं. रुग्णालयातच तिचा मृत्यू झाला.
 
ANI शी बोलताना चेतनाचे वडील वरदराज म्हणाले, "मी चेतनाला ही शस्त्रक्रिया करू नको असं बजावलं होतं. शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत निर्माण झाली होती. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी चेतनाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती आम्हाला दिली होती." आम्ही तिला तात्काळ दुसऱ्या रुग्णालयात दाखल केलं. पण, तिचा मृत्यू झाला, चेतनाचे वडील प्रसारमाध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले.
 
चेतनाच्या कुटुंबीयांनी या कॉस्मेटिक्स सेंटरविरोधात पोलिसात निष्काळजीपणाची तक्रार दाखल केलीये. बंगळुरूचे पोलीस उपायुक्त (नॉर्थ) अविनाश पाटील बीबीसीशी बोलताना म्हणाले, "तब्येत बिघडल्यानंतर चेतनाला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून आम्ही चौकशी करत आहोत."
 
पण, चेतनाने वजन कमी करण्यासाठी केलेली 'लायपोसक्शन' शस्त्रक्रिया काय आहे?
 
'लायपोसक्शन' म्हणजे काय?
लठ्ठपणाला वैद्यकीय भाषेत ओबेसिटी असं म्हणतात. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेनुसार, भारतातील दर चार व्यक्तींमागे एक व्यक्ती लठ्ठपणाच्या आजाराने ग्रस्त आहे.
 
वजन कमी करण्यासाठी अनेक लोक शस्त्रक्रियेचा प्रर्याय निवडतात. 'लायपोसक्शन' वजन कमी करण्यासाठीचा एक पर्याय आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 'लायपोसक्शन' एक शस्त्रक्रिया आहे. यात, सक्शन टेक्निकचा वापर करून शरीराच्या विशिष्ठ भागावर जमा झालेलं फॅट किंवा सामान्य भाषेत शरीरावर जमा झालेली चरबी काढली जाते.
 
तज्ज्ञ सांगतात, आपल्या शरीरात दोन प्रकारच्या चरबी असतात. एक त्वचेच्या खाली आणि दुसरी पोटाच्या आत. मुंबईतील वरिष्ठ बेरिअॅट्रीक सर्जन डॉ संजय बोरूडे म्हणाले, "लायपोसक्शन शस्त्रक्रियेमध्ये त्वचेच्या खाली जमा झालेली चरबी खेचून काढण्यात येते." लायपोसक्शन वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया नसून, शरीराला योग्य शेप किंवा आकार देणारी शस्त्रक्रिया आहे, ते पुढे म्हणाले.
 
पोटाच्या आत जमा चरबीमुळे मधूमेहासारखे आजार होतात. पण, त्वचेच्या खाली जमा झालेलं फॅट मेटॅबोलिकली (चयापचयक्रिया) अॅक्टिव्ह नसतं. डॉ. बोरूडे पुढे सांगतात, "लायपोसक्शन शस्त्रक्रियेनंतर मेटॅबोलिक आजार बरे होत नाहीत."
 
वजन वाढल्यानंतर शरीरातील मेदाच्या पेशींचा आकार आणि संख्या वाढते. लायपोसक्शन शस्त्रक्रियेमुळे शरीरातील विशिष्ठ भागावर मेदाच्या पेशी कमी होण्यास मदत होते.
 
दिल्लीच्या फोर्टिस रुग्णालयाच्या प्लॅस्टिक सर्जन डॉ. रश्मी तनेजा म्हणतात, "लायपोसक्शन शस्त्रक्रियेमध्ये शरीरात एक द्रव पदार्थ सोडला (इनजेक्ट) केला जातो. आणि या द्रव पदार्थासोबत शरीरातील चरबी बाहेर खेचून घेतली जाते." ही शस्त्रक्रिया करताना रक्तस्राव होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी औषधंही दिली जातात.
 
'लायपोसक्शन' शस्त्रक्रिया कोणत्या भागावर केली जाते?
डाएट किंवा व्यायाम केल्यानंतरही शरीरातील ज्या भागावर जमा झालेली चरबी कमी होत नाही. ही चरबी काढण्यासाठी 'लायपोसक्शन' शस्त्रक्रियेचा वापर केला जातो.
 
उदाहरणार्थ ओटीपोट, नितंब, कंबर, मांड्या, हात, मान, गळा अशा भागावर जमा झालेली चरबी 'लायपोसक्शन' शस्त्रक्रियेच्या माध्यमातून खेचून काढली जाते. डॉ. संजय बोरुडे पुढे म्हणाले, "शरीराच्या एकाद्या भागावर चरबी जमा झाली असेल. तर, ती काढण्यासाठी याचा वापर केला जातो."
 
लायपोसक्शन शस्त्रक्रियेला लायपोप्लास्टी आणि बॉडी कॉन्टोरिंग असंही म्हटलं जातं. तज्ज्ञ म्हणतात, रुग्णांना शरीरातील एकापेक्षा जास्त भागावर लायपोसक्शन शस्त्रक्रिया करायची असेल तर, एकाच वेळी करता येत नाही.
 
लायपोसक्शन शस्त्रक्रिया सुरक्षित आहे?
डॉ. रश्मी तनेजा पुढे सांगतात, "लायपोसक्शन शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटरमध्ये केली जाते. ही शस्त्रक्रिया लोकल किंवा जनरल अॅनेस्थेशिया देऊन करण्यात येते. ही शस्त्रक्रिया करताना अॅनेस्थेशियातज्ज्ञ (भूलतज्ज्ञ) उपस्थित असतात."
 
लायपोसक्शन सुरक्षित मानलं जातं पण, याचे अनेक धोकेदेखील आहेत. लोकल अॅनेस्थेशियामुळे काहीवेळा रिअॅक्शन होण्याची शक्यता असते, असं तज्ज्ञांचं मत आहे.
 
"लायपोसक्शन शस्त्रक्रिया योग्य पद्धतीने केली तर, सुरक्षित आहे." लायपोसक्शन सामान्यत: जनरल अॅनेस्थेशिया देऊन करण्यात येतं. पण, काहीवेळा कमी पैशात ही शस्त्रक्रिया करण्यासाठी लोकल अॅनेस्थेशिया देऊनही हे ऑपरेशन केलं जातं, डॉ. संजय बोरुडे म्हणाले.
 
मायो क्लिनिकच्या माहितीनुसार, लायपोसक्शन शस्त्रक्रियेत काही धोके असतात.
 
संसर्गाची शक्यता
त्वचेच्या खालच्या भागात द्रव पदार्थ जमा होणं
शस्त्रक्रिया झालेला भाग काही काळासाठी किंवा कायमस्वरूपी बधिर होतो
शरीरात द्रव पदार्थ इंजेक्ट करताना आणि बाहेर काढताना किडनी, हृदय किंवा फुफ्फुसांना इजा होण्याची शक्यता
"लायपोसक्शन शस्त्रक्रियेत पल्मनरी आणि फॅट एम्बॉलिझमचा धोका असतो. मेदाचे तुकडे रक्तवाहिन्यात अडकण्याची आणि फुफ्फुसापर्यंत जाण्याची शक्यता असते. यामुळे फुफ्फुसात अडथळा निर्माण होतो," डॉ. रश्मी तनेजा पुढे सांगतात.
 
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, काहीवेळा मेदाचे तुकडे मेंदूपर्यंत जाण्याची शक्यता असते. त्यामुळे फॅट एम्बॉलिझम एक आपात्कालीन परिस्थिती आहे.
 
ही शस्त्रक्रिया कोणी करू नये?
लायपोसक्शन शस्त्रक्रिया करण्याआधी रुग्णाची उंची आणि त्याचा बॉडी मास इंडेक्स (BMI) तपासून घेतला जातो. आपलं वजन योग्य आहे का नाही, हे शोधण्यासाठी बॉडी मास इंडेक्स महत्त्वाचा आहे. रुग्णाला कोणत्या भागावर शस्त्रक्रिया करायची आहे याची पूर्ण माहिती घेतली जाते.
 
डॉ. तनेजा पुढे म्हणाल्या, "ज्या रुग्णांचा BMI 25-30 च्या मध्ये आहे अशा रुग्णांवर लायपोसक्शन शस्त्रक्रिया करता येते." बॉडी मास इंडेक्स 30 पेक्षा जास्त असणाऱ्यांनी वजन कमी करण्यासाठी इतर शस्त्रक्रियांचा पर्याय शोधावा. कारण अशा रुग्णांना लायपोसक्शनमुळे होणाऱ्या फायद्यापेक्षा धोका जास्त असतो.
 
लायपोसक्शन शस्त्रक्रिया कोणी करू नये,
 
श्वास घेण्यास अडथळा असणारे
औषधांच्या अॅलर्जीक रिअॅक्शनचा त्रास असणारे
ज्यांची प्रकृती चांगली नाही. त्यांनी ही शस्त्रक्रिया करू नये
तर, अपोलो रुग्णालयाच्या माहितीनुसार लायपोसक्शन शस्त्रक्रियेचे तीन प्रकार आहेत.
 
अल्ट्रासाउंड असिस्टेड-लायपोसक्शन
लेझर असिस्टेड-लायपोसक्शन
पॉवर असिस्टेड-लायपोसक्शन
तुमसेंट (Tumescent) लायपोसक्शन