'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणाराच', या सिंहगर्जनेने इंग्रजांचे धाबे दणाणून सोडणारे व देशबांधवात स्वातंत्र्याबाबत जागृती निर्माण करणारे महान देशभक्त बाळ गंगाधर टिळक होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरी तालुक्यातील चिखली या खेडेगावांत झाला. त्यांचे वडील पंडित गंगाधर टिळक विद्वान शिक्षक होते. टिळकांच्या लहान वयातच वडिलांचे निधन झाले. आईनेच त्यांचे पालन पोषण केले.
बालवयापासूनच आईने सांगितलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरूषांच्या शौर्यकथांनी त्यांचे मन देशभक्तीने ठासून भरले गेले. कला शाखेत पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी मिळवली. वकिली पेशास प्रतिष्ठेसोबतच चांगली कमाई असल्याने त्या दिवसात या पदवीस विशेष महत्त्व होते. मात्र, टिळकांनी शांत व सुरक्षित जीवनाऐवजी इंग्रजाविरुद्ध दंड थोपटून स्वातंत्र्य संग्रामात स्वत:स झोकून दिले.
समाजजागृती व प्रगतीसाठी शिक्षण आवश्यक असते. हे हेरून टिळकांनी चिपळूणकर, नामजोशी, आपटे व आगरकर या चार उच्चविद्याविभूषित तरूणांच्या साहाय्याने पुण्यात इंग्लिश स्कूलची स्थापना केली. कमी पैशांत उच्चशिक्षण देण्याच्या ध्येयाने प्रेरीत टिळकांनी येथे अध्यापनाचे काम केले. वर्तमानपत्र जनतेला जागृत करण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे हेरून त्यांनी 'केसरी' व 'मराठा' ही अनुक्रमे मराठी व इंग्रजीतील साप्ताहिके सुरू केली. या वृत्तपत्रांच्या माध्यमातून टिळकांनी सिंहगर्जना करत जुलमी इंग्रजी सत्तेवर आसूड ओढून लोकजागृती केली.
सरकारच्या अन्याय धोरणांचा त्यांनी अग्रलेखांतून खरपूस समाचार घेतला. सरकारने दडपशाहीचा मार्ग अवलंबत टिळकांना त्यासाठी अनेकदा तुरुंगातही टाकले. ब्रह्मदेशातील मंडाले येथील सहा वर्षांची शिक्षा यात सर्वांत मोठी आहे. टिळकांनी या काळात गीतारहस्य हा गीतेवरील टीका ग्रंथ लिहिला. याशिवाय आर्यांचे मूळ वसतीस्थान या विषयावरही ग्रंथ लिहिला. टिळकांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण करून स्वातंत्र्यप्राप्तीची इर्ष्या जागवली.
शिवजयंती व गणेशोत्सवास व्यापक स्वरूप देऊन त्यांनी लोकांमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीची ज्योत पेटवली. स्वातंत्र्य दान मागितल्याने मिळणार नसून त्यासाठी संघर्ष करावा लागेल यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांच्या कॉंग्रेस प्रवेशानंतरच स्वराज्यप्राप्ती हेच कॉंग्रेसचे अंतिम ध्येय असल्याने निश्चित करण्यात आले. ब्रिटिश सत्तेचे आसन खिळखिळे करणार्या त्यांच्या डरकाळीमुळेच त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून संबोधले जाते.