गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. आयपीएल लेख
Written By वेबदुनिया|

सचिन: महान खेळाडू

ND
'क्रिकेट धर्म असेल तर सचिन त्याचा ईश्वर असेल' असे एकदा रवी शास्त्री यांनी म्हटले होते. 35 वर्षीय सचिन रमेश तेंडूलकर याच्या बाबतीत हे अगदी तंतोतंत बरोबर ठरले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने गाठलेला हा प्रवास अगदी स्वप्नवत आहे. क्रिकेट हेच सर्वस्व असलेला सचिन टीकाकारांना उत्तर देतो तेही बॅटनेच.

ज्या वयात क्रिकेटमध्ये आलेले खेळाडू पहिले शतक करतात, तोपर्यंत सचिनने अनेक शतके आपल्या नावावर केली होती. 16 वर्षांचा असताना पाकिस्तानविरूद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या सचिनने धडाकेबाज फलंदाजी करून आपली प्रतिभा जगाला दाखवून दिली. परंतु, त्यानंतरच्या अठरा वर्षांच्या कारकीर्दीत प्रतिभावंत हा शब्दही त्याच्यापुढे थिटा ठरावा अशी त्याची कामगिरी आहे. म्हणूनच क्रिकेटचा आदर्श आणि ईश्वर अशी संबोधने त्याच्यासाठी वापरली जातात.

अनेक विश्वविक्रम त्याच्या नावावर जमा आहेत. विक्रम मोजणे सोडून द्यावे अशी त्याच्या बाबतीत स्थिती आहे. त्याच्या या कामगिरीमुळेच त्याला महान क्रिकेटपटू म्हणून संबोधले जाते. आजपर्यंतच्या क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जाते. सचिनच्या नावावर सर्वांत जास्त धावा करण्याचा विक्रम असून एकदिवसीय व कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत जास्त शतके त्याने केली आहेत. हे सर्व विक्रम चमत्काराशिवाय पूर्ण करूच शकत नाही, असे वाटावे अशी स्थिती आहे.

भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल भारत सरकारने सचिनला 1997-1998 मध्ये राजीव गांधी खेलरत्न या पुरस्काराने सन्मानित केले होते. तसेच पदमश्रीही देण्यात आली. या वर्षी त्याला पद्मविभूषण पुरस्कारही देण्यात आला. पाच फूट चार इंच असलेल्या या चॅम्पियनने मास्टर ब्लास्टर बनण्यासाठी अनेक दुखापती सहन केल्या. पण तरीही त्याचे खेळाप्रती प्रेम कमी झाले नाही.

अनेक वेळा 'मालिकावीर' आणि 'सामनावीराचा' पुरस्कार प्राप्त करणार्‍या सचिनला विस्डनने एका वर्षात 1000 धावा पूर्ण केल्याबद्दल 1997 मध्ये 'क्रिकेटियर ऑफ द इयर' म्हणून घोषित केले होते. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. 1999, 2001 आणि 2002 मध्येही तो 'प्लेयर ऑफ द इयर' राहिला. 1000 धावांचा आकडा त्याने आपल्या करीयरमध्ये सहा वेळा पार केला. (1994, 1996, 1997, 1998, 2000 आणि 2003) सन 1998 मध्ये तर त्याने एका वर्षात 1894 धावा केल्या होत्या. त्या धावा आजही एकदिवसीय सामन्यात विश्वविक्रम म्हणून अस्तित्वात आहेत.