सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जानेवारी 2021 (14:24 IST)

हा नोकर चोर आहे

एके दिवशी एक श्रीमंत व्यापारी बिरबलाकडे आला आणि म्हणाला, ‘माझ्या घरी कोणीतरी चोरी केली आहे. माझे दागिने चोरले आहेत. माझ्या घरी दहा नोकर आहेत. त्यांच्यापैकीच कोणीतरी ते चोरले असल्याचा माझा संशय आहे. मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारले पण त्यातील एकजणही कबूल झाला नाही. कृपया करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा.'
 
बिरबल त्या व्यापार्याचा घरी गेला. त्याने त्या दहाही नोकरांना एकत्र बोलावले व त्यांना म्हणाला की, माझ्याकडे दहा जादूच्या काठ्या आहेत. त्या मी तुम्हाला देत आहे. या काठ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व काठ्या समान आहेत. मी त्या तुम्हाला देत आहे. आज तुमच्याकडे  ठेवा व उद्या मला परत करा. ज्याने चोरी केली असेल, त्याची काठी रात्रीत एक इंचाने वाढेल.' दागिने चोरणारा नोकर घाबरला. आपली चोरी पकडली जाईल म्हणून तो काठी एक इंचाने कापतो.
 
त्याला वाटते की, सकाळी ती परत एक इंचाने वाढेल व कुणाला काही कळणार नाही. दुसर्यार  दिवशी बिरबलाने नोकरांच्या हातातील काठ्या पाहिल. त्याला एका नोकराची काठी छोटी झाल्याचे आढळले. त्याच्याकडे बोट दाखवत बिरबल म्हणाला, ‘हा नोकर चोर आहे. त्यानेच तुमचे दागिने चोरले.' शेवटी त्या नोकरानेही ते कबूल केले व त्या व्यापार्याचे दागिने परत केले.