रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By

पितृदिन विशेष : बाप

ज्यांनी जन्म दिला ते
माता नि पिता।
मीच जन्मदाता झाले जेव्हा।।1।।
तेव्हाच कळाले झाडा
विना छाया।
बापा विना माया नसे जगी।।2।।
आणिक कळाले पचवितो ताप
त्याचे नाव बाप हेची सत्य।।3।।
बाप ज्या घरात त्या घरा महत्त्व
आणिक अस्तित्व 
जनामध्ये ।।4।।
मुलांनी बापाचा करावा आदर
तो एक ईश्वर मुलासाठी।।5।।


आईबद्दल अनेकांनी लिहिलं, देवादिकांपासून ते साहित्यिकांपर्यंत सर्वानीच आईची महती गायिली आहे. ‘आई’हा शब्द असेल तर त्या शब्दाचा अर्थ म्हणजे बाप आहे. तसे पाहिले तर बापच आईला अर्थ देतो. घरातल्या अर्थार्जनापासून ते घराला अर्थ म्हणजे महत्त्व इथपर्यंत अर्थ देण्याचं काम बाप करतो. आई आणि वडिलांची माया आपल्यावर किती असते, त्याला मोजमाप नाही. मुलाला लहानाचे मोठे करताना तळहाताचा पाळणा आणि नेत्राचा दिवा करून लहानाचं मोठं केलेलं असतं. आपली मुलं उच्चपदस्थ व्हावीत. थोडक्यात टॉपला जावीत म्हणून रात्र न् दिवस बापच झुरत असतो. बाप म्हणजे आदरयुक्त भीती, बाप म्हणजे तटबंदी, समाज उन्हाचे चटके सहन करून, घरी आल्यानंतर बाप नावाच्या वटवृक्षाखाली ज्यांना बसण्याचं भाग्य लाभते त्यांना हे तोपर्यंत पटत नाही.

जोपर्यंत तो स्वत: बाप होत नाही. मुलाचे अपराध पोटात घालून त्याच्यावर जीवापाड प्रेम करतो तचं नाव बाप. या जगातल्या प्रवेशापासून ते या अवस्थेपर्यंत बापाने घेतलेल्या त्रासाचा विचार करता बापाला परमेश्वर समजून आदर करावा. एवढं जरी नाही जमलं तरी चालेल कमीत कमी त्यांना वृद्धाश्रमात तरी पाठवू नये. यासाठी बापानेही मुलं मोठी झाल्यावर आपण लहान व्हावं लागतं तेव्हाच मेळ बसतो.

गोविंद काळे