शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 जून 2021 (08:50 IST)

झाशीची राणी ,अशी होती मर्दानी....

ती न होती राजकन्या
न राजघराण्यात जन्मली.
पेशवे नाना मानसबंधु संगती
युद्धकलेत पारंगत झाली.
शूर वीर साहसी पराक्रमी ती मानीनी
झाशीची राणी ,अशी होती मर्दानी....
 
तांबेची कन्या  मनकर्णिका
मेधावी रुपसंपन्न गोड छबेली.
तलवार बाजी भाला फेक
घोड्यावर रपेट निपुण झाली.
मलखांब व्यायाम कसरत नित्यनेमानी
झाशीची राणी ,अशी  होती मर्दानी....
 
झाशी संस्थानचे राजे गंगाधरपंत
मनकर्णिकेची विवााह गाठ बांधली.
लक्ष्मीबाई नाव नवे , लाभले राज्य
सौभाग्याने झाशीची राणी झाली.
लाडक्या राणीवर अपार प्रेम केले प्रजेनी
झाशीची राणी ,अशी होती मर्दानी....
 
संसार वेलीवर फुल फुलले
राज्याला वारस लाभला.
असा हा आनंद उभयतांचा
फार काळ नाही टिकला.
झाशी संस्थानाला वारस दत्तक घेऊनी
झाशीची राणी ,अशी होती मर्दानी....
 
गेला शोक-चिंतेने झाशीचा राजा
सौभाग्य लक्ष्मीबाईचे अचानक ढळले.
राज्याचा कारभार घेऊनी हाती
राणीने राज्य खंबीरपणे सांभाळले.
चतुर चपळ ,धाडसी धोरणी झाशीची स्वामीनी
झाशीची राणी, अशी होती मर्दानी....
 
न राजा न राजपुत्र निसंतान राज्य
खालसा करण्या संस्थान झाशीचे.
किल्ल्यावर इंग्रजांनी निशान रोवून
आटोकाट अथक प्रयत्न डलहौसीचे.
उतरली रणांगणी राणी ढाल तलवार घेऊनी
झाशीची राणी, अशी होती मर्दानी....
 
"मेरी झांसी नही दूंगी "
" माझी झाशी मी देणार नाही."
अंतीम श्वासापर्यंत झाशी लढवेन
जनरोष नको विधवेवर काही .
लढण्या डोईस फेटा, मर्दानी पोषाक चढवूनी
झाशीची राणी ,अशी होती मर्दानी....
 
स्वराज्याचे महायुद्ध स्वत्व स्वाभिमान
स्वातंत्र्य समर महान क्रांती झाली.
किल्ल्यात झाशीच्या असुरक्षितता
स्त्री सैनिकांची सेना तरबेज ठेवली.
घोड्यावर बैसूनी राणी उडी घेतली तटावरुनी
झाशीची राणी ,अशी होती मर्दानी.....
 
घोडा तिचा गेला दुर्दैवाने
तलवार चालवून दुर्गेसम लढली.
नव्या घोड्याने  दिला धोका
रक्तात ती न्हाऊन निघाली.
पोशाख मर्दानी ,अलंकारीत अनेक जखमांनी
झाशीची राणी ,अशी होती मर्दानी.....
 
मठात घेऊनी गेल्या सख्या
तेथेच शेवटचा श्वास सोडला.
शीलवती देशभक्त क्रांतीकारीणीचा
तेथेच अंतिम संस्कार झाला.
प्राणपणाने लढूनी स्वातंत्र्य यज्ञी आहुती देऊनी
झाशीची राणी ,अशी होती मर्दानी.....
 
स्त्री स्त्रीमन स्त्रीतन सुदृढ सक्षम 
व्हायचे सबला शरीरबल वाढवूनी .
झाशी राणीने दिला आदर्श महान
राणी लक्ष्मीबाईसम मर्दानी होऊनी.
दुर्गेसम रणचंडकेला या आदरांजली  मनोमनी
झाशीची राणी ,अशी होती मर्दानी.....
 
मीना खोंड