शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी लेखक
Written By वेबदुनिया|

उत्तम कांबळे यांच्या निवडीचे स्वागत!

- उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी उत्तम कांबळे यांच्या निवडीमुळे उपेक्षित आणि वंचितांना न्याय देण्यासाठी झटणाज्या सामाजिक चळवळीतल्या पत्रकार-साहित्यिकाचा सार्थ गौरव झाला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी उत्तम कांबळे यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.

श्री. कांबळे यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री भुजबळ यांनी म्हटले आहे की, केवळ दलित समाजातील म्हणून नव्हे; तर एक उत्तम पत्रकार, तितकाच श्रेष्ठ लेखक आणि कवी म्हणून उत्तम कांबळे यांचा दर्जा हा नेहमीच वरचा राहिला आहे. गावाबाहेर उतरलेल्या भटक्यांचे पाल हा सुद्धा चांगल्या बातमीचा विषय होऊ शकतो; त्या समाजाला न्याय देण्यासाठी लेखणीच्या माध्यमातून आवाज उठविता येतो, हे श्री. कांबळे यांनीच दाखवून दिले. एका व्रतस्थाप्रमाणेच त्यांनी आपली लेखणी या शोषित वर्गाच्या कल्याणासाठी चालविली आहे. ज्या असंख्य साहित्यिकांनी आजतागायत दीनदलित, सर्वसामान्य कष्टकरी वर्गाचे दुःख, वेदना, भावना आपल्या साहित्यातून मांडल्या; त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला. अशा साहित्यिकांचा तसेच उपेक्षितांचाही उत्तम कांबळे यांच्या निवडीमुळे सन्मान झाला आहे. साहित्य संमेलनाचे व्यासपीठ आज एका वेगळ्या अर्थाने परिपूर्ण झाले आहे, अशी भावनाही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.