तमिळनाडूतील वैद्यनाथस्वामी मंदिर
देशात भगवान शिवशंकराची जी श्रध्दास्थाने आहेत, त्यात वैथिस्वरन कोईलला विशेष महत्त्व आहे. स्वतः: भगवान शंकर येथे वैदियंतर स्वरूपात भक्तांचे रक्षण करतात. वैदियंतर अर्थ रोगांवर उपचार करणारा डॉक्टर किंवा वैद्य. येथे एक- दोन नव्हे तर 4 हजार 480 रोगांवर इलाज केला जातो. रामायणातील उल्लेख असलेल्या जटायू आणि रावण युद्धानंतर जटायूचे दोन पंख येथेच पडले होते, अशी लोकांची धारणा आहे. सीतेचा शोध घेत प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण येथे आले होते. सीतेचे अपहरण झाल्याचे जटायूने रामाला येथे सांगितले आणि प्राण सोडला. प्रभू रामांनी त्याच्यावर येथेच अंत्यसंस्कार केले. जटायूला जेथे भडाग्नी देण्यात आला ती जागा जटायू कुंड म्हणून ओळखली जाते. अनेक जण या कुंडातील विभूती प्रसाद म्हणून भक्षण करतात.
रावणाचा वध करून परतताना प्रभू श्रीराम आणि सीता यांनी येथेच शिवाची आराधना केली होती, असा उल्लेख कथांमध्ये आहे. देवीच्या शक्तीमुळे भगवान मुरुगन यांना भालारूपी शस्त्र येथेच प्राप्त झाले होते. याच शस्त्राने त्यांनी पद्मासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. साधू- संतांनीही या देवस्थानी देवाची आराधना केली असून विश्वामित्र, वशिष्ठ, तिरूवानाकुरसर, तिरूगनंसबंदर, अरूनागीरीनाथर हे साधू संतही येथेच वास्तव्याला होते.अंगकरणने (तामिळ भाषेत मंगळ ग्रहाचे नाव ) आपला कुष्ठरोग बरा व्हावा यासाठी येथेच देवाची करूणा भाकली होती. ज्यांच्या पत्रिकेत मंगळदोष आहे, ते येथे येऊन अंगकरण पूजा करतात. येथील सिद्धामिरथा कुंडातील पाण्याचा वापर करून विशिष्ट औषध तयार केले जाते. त्याने रोग बरे होत असल्याने लाखो भाविक दरवर्षी येथे भेट देतात. येथील औषध घेतल्यानंतर पाच जन्मापर्यंत कुठलाही रोग औषध घेणार्याला होत नाही अशी भाविकांची श्रद्धा आहे. भगवान वैद्यनाथस्वामी यांच्या नावाने वैईथीस्वरन कोइल असे नाव या शहराला देण्यात आले आहे. ज्योतीधाम या नावानेही हे स्थान प्रसिद्ध आहे. खजुराच्या झाडावर बोटांच्या ठशांच्या साहाय्याने येथे भविष्य सांगितले जाते. कसे जाल? रेल्वेमार्ग- चेन्नईच्या थानजावर मार्गावरून वैथीस्वरन रेल्वे स्टेशन गाठता येऊ शकते. रस्ता मार्ग- वैथीस्वरन कोईल चिदंबरम शहराजवळ आहे. हे शहर चेन्नईपासून 235 किलोमीटरवर आहे. चिदंबरमपासून 26 किलोमीटरवर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हवाई मार्ग : चेन्नई विमानतळापासून हे तीर्थक्षेत्र जवळ आहे.