शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. धर्मयात्रा
  4. »
  5. धर्मयात्रा लेख
Written By दीपक खंडागळे|

भाविकांचे श्रध्दास्थान शिर्डीचे साईबाबा

WDWD
अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्यातील 'शिर्डी' हे आधुनिक भारतातील तीर्थक्षेत्र बनले आहे. साईबाबांच्या वास्तव्याने पुनित झालेले एकेकाळचे खेडेगाव आता शहर बनले आहे. बाबांचा आधार घेण्यासाठी देश-विदेशातील लोक येथे येत असतात. मनमाड अहमदनगर या राज्य मार्गावर हे गाव वसलेले आहे.

  ''माझ्या देहत्यागानंतर माझी हाडं माझ्या तुर्बतीतून बोलतील... मुंग्यांसारखी माणसांची रीघ लागेल.''      
अलौकिक विभूती असलेले सदगुरू श्री साईबाबा शिर्डीत प्रकटले व जवळपास 60 वर्षे आपले मानवी वेशातील अवतारकार्य पूर्ण करून येथेच समाधीस्थ झाले. शिर्डीस येणे, वास्तव्य करणे हीच मोठी साधना असल्याचा प्रत्यय स्वत: साईबाबांनी घेतला व तोच इतरांनाही येत असतो. श्री साईबाबांच्या पवित्र पदस्पर्शाने व अलौकिक अवतार कार्याने पावन झालेली ही पुण्यभूमी आज सर्वच जाती-धर्मातील पंथ, संप्रदायातील लोकांना मुक्त प्रवेश असणारे ठिकाण आहे.

WDWD
श्री साईबाबांनी आपल्या अवतारकार्यात आपल्या भक्तांना आश्वासन दिलं होतं, ''माझ्या देहत्यागानंतर माझी हाडं माझ्या तुर्बतीतून बोलतील... मुंग्यांसारखी माणसांची रीघ लागेल.'' त्याचा प्रत्यय आज येतो आहे. शेकडो, हजारो, लाखो भाविक देशाच्या कानाकोपर्‍यातून, विदेशातून शिर्डीला गर्दी करीत आहेत. येथूनच बाबांनी संपूर्ण जगाला 'श्रध्दा-सबूरी' हा महामंत्र दिला. त्याचमुळे बाबांचे समाधीस्थळ लाखो भाविकांच्या मनाला उर्जा देणारे केंद्र बनले आहे. शिर्डीस आल्यावर श्री साईबाबांच्या दर्शनानंतर प्राप्त होणारी मन:शांती, मिळणारा आत्मविश्वास, परम् मन:शांतीचा येणारा प्रत्यय यामुळे शिर्डी हे जगातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे.

श्री साईबाबांचे समाधी मंदि
WD
हे मुख्य मंदिर आहे. मंदिराची ही इमारत नागपूरचे निस्सीम साईभक्त श्री. गोपाळराव बुट्टी यांनी बाबांच्या आशीर्वादाने बांधली होती. म्हणून 'बुट्टी वाडा' या नावानेही ती ओळखली जाते. १५ ऑक्टोबर १९१८ रोजी विजयादशमीच्या दिवशी बाबांनी आपल्या ऐहिक जीवनाचे सीमोल्लंघन केले आणि त्यांच्या व्यक्तव्यानुसार त्यांचा देह या वाड्यात ठेवण्यात आला, ते आजचे समाधी मंदिर होय. या ठिकाणी श्री साईबाबांची पवित्र समाधी व मूर्ती आहे. समाधी मंदिरात दररोज नित्य पूजा, अभिषेक व चार आरत्या होतात.

गुरूस्थान
बाबा सोळा वर्षांचे असताना ज्या ठिकाणी प्रथम दृष्ट्रीस पडले ते हे समाधी मंदिर परिसरातील ठिकाण, त्यांच्या गुरूचे आहे, असे बाबा सांगत असत. श्री साईसच्चरितात उल्लेख असलेला प्रसिध्द निंब वृक्ष येथेच आहे. या ठिकाणी गुरूवारी व शुक्रवारी उद (लोबान, धूप) प्रज्वलित केल्यास भाविकांचा दु:ख परिहार होतो, असे श्री साईसच्चरितात म्हटले आहे.

द्वारकामाई(मशीद)
बाबा शिर्डीस आल्यापासून समाधीस्थ होईपर्यंत त्यांचे वास्तव्य सलग 60 वर्षे समाधी मंदिर परिसरातील या ठिकाणी होते. असंख्य भक्तांना या ठिकाणी बाबांनी कृपाप्रसाद दिला. बाबा ज्या शिळेवर बसत असत, ती येथेच आहे. शिवाय बाबांनी प्रज्वलित केलेली धुनी या ठिकाणी अखंडपणे प्रदीप्त आहे. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी बाबा याच धुनीतून त्यांना उदी देत असत. आताही भक्तांना द‍िली जाणारी उदी याच धुनीतून प्राप्त होते. बाबा येथे अन्न शिजवून भक्तांना वाढीत असत.

चावडी
WDWD
एक दिवसाआड बाबा या ठिकाणी मिरवणूकीने द्वारकामाईतून येत असत व मुक्काम करीत असत. समाधी मंदिर परिसराच्या जवळच पूर्वेला चावडी आहे. आता प्रत्येक गुरूवारी रात्री 9:15 ते 10:00 या वेळी द्वारकामाईतून चावडीकडे पालखी मिरवणूक निघत असते. या पालखीतच बाबांची तसबीर, सटका व पादुका ठेवलेल्या असतात.

लेंडीबा
समाधी मंदिर परिसरातच असलेल्या या ठिकाणी बाबा फेरफटका मारावयास जात असत. बाबांनी स्वत: या ठिकाणी लावलेल्या पिंपळ वृक्षाशेजारी नंदादीप अखंडपणे तेवत ठेवलेला आहे. शिवाय या ठिकाणी दत्तमंदिर असून बाबांचा आवडता घोडा श्यामकर्ण (श्यामसुंदर) जवळच चिरनिद्रा घेत आहे. या ठिकाणी असलेल्या विहिरीस 'बाबांची शिवडी' असे म्हटले जाते.

इतर स्थान
बाबांच्या सान्निध्यात राहिलेले त्यांचे परमभक्त श्री. तात्या पाटील कोते, श्री. भाऊ महाराज कुंभार, श्री पी.व्ही. पदमनाभ अय्यर, श्री नानावली व श्री. अब्दुलबाबा यांच्या समाधी लेंडीबागेजवळ आहेत.

संग्रहालय
WDWD
श्री साईबाबांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या गुरातन वस्तूंचे दर्शन साईभक्तांना घडावे या उद्देशाने मुख्य मंदिराजवळच असलेल्या दीक्षितवाड्यांतील संग्रहालयात संस्थानने या वस्तूंचा एकत्रित संग्रह करून ठेवलेला आहे. यामध्ये श्री साईबाबांच्या पादुका, सटका, टमरेल, चिलीम, कफनी, सारीपाट, ग्रामोफोन, रेकॉर्ड, महाराजांचा कोट, दळण्याचे जाते, श्रींचा रथ, श्रींना अखेरचे स्नान घातलेला पलंग, बाबा स्वयंपाक करीत ती तांब्याची भांडी तसेच दुर्मिळ फोटो आदि वस्तूंचा संग्रह केलेला आहे. संग्रहालय सकाळी 9.30 ते संध्या 6.30 वाजेपर्यंत उघडे असते.

खंडोबा मंदि
हे मंदिर नगर-मनमाड रस्त्यावर श्री साईनाथ रूग्णालयाजवळ आहे. चाँद पाटलाच्या पत्नीच्या भावाच्या लग्नाचे वर्‍हाड जेव्हा शिर्डीत आले तेव्हा या मंदिराजवळील वटवृक्षास्थळी ते उतरले होते. या वर्‍हाडासोबत आलेले बाबा जेव्हा मंदिराच्या पटांगणात सर्वांसमवेत उतरले तेव्हा मंदिराचे पुजारी म्हाळसापती यांनी या बालफकीराचे 'आओ साई' म्हणून स्वागत केले होते.

मुख्य उत्सव
WDWD
श्री साईबाबा संस्थानच्या वतीने श्री रामनवमी, गुरूपौर्णिमा व विजयालक्ष्मी हे तीन प्रमुख उत्सव साजरे केले जातात. या उत्सवातील मुख्य दिवशी समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर उघडे ठेवण्यात येते. उत्सव काळात कीर्तन, भजन, प्रवचन आदि भरगच्च कार्यक्रम आयोजित केले जातात. श्रीरामनवमी उत्सव चैत्र शुध्द अष्टमीला प्रारंभ होतो. चैत्र शुध्द नवमी हा उत्सवाचा मुख्य दिवस असतो. तर चैत्र शुध्द दशमी हा उत्सवाचा सांगता दिवस असतो. गुरूपौर्णिमा उत्सवाचा आषाढ शुध्द चतुर्दशीला प्रारंभ होतो. हा उत्सव देखील तीन दिवस चालतो. विजयादशमी, म्हणजेच पुण्यतिथी उत्सवाचा -अष्टमीसह नवमी किंवा नवमीसह दशमी असेल तर अष्टमीला प्रारंभ दिन, नवमीसह दशमी मुख्य दिवस राहतो आणि सांगता दिनी एकादशी असेल तर द्वादशी हा सांगता दिवस असतो. इतर वेळेस (प्रसंगी) नवमी हा प्रारंभ दिन असेल, दशमी हा मुख्य दिवस असतो.

कसे पोहोचाल?
1. मुंबई रेल्वे, बस, किंवा विमानाने जाऊ शकतात. मनमाड नजीकचे रेल्वे स्टेशन आहे.
2. मनमाडहून बस किंवा टॅक्सी करू शकतात.
3. या ठिकाणी जाण्यासाठी बस सेवा देखील उपलब्ध आहेत.
4. मुंबईहून टॅक्सी देखील करू शकतात. (जर तुम्ही विदेशी पर्यटक असाल तर ड्रायव्हरच्या लायसन्सची आणि इतर प्राथमिक बाबींची पडताळणी करा.)