शनिवार, 2 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. »
  3. धर्मयात्रा
  4. »
  5. धर्मयात्रा लेख
Written By वेबदुनिया|

नंदी नसलेले कपालेश्वर मंदिर (पाहा व्हिडिओ)

नाशिकमध्ये पंचवटीत गोदावरी नदीच्या काठी एका उंच टेकडीवर कपालेश्वर मंदिर वसले आहे. कपालेश्वर म्हणजे महादेव. प्रत्यक्ष शंकराने येथे वास केल्याचा उल्लेख आख्यायिकांमध्ये आढळतो. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे देशातील पहिलेच मंदिर असावे, जेथे शंकरासमोर नंदी नाही.

WD
येथे नंदी का नाही याचीही पुराणात एक कथा आहे. एकदा इंद्रसभा भरली होती. त्यावेळी सर्व देव सभेस उपस्थित होते. त्यावेळेस ब्रह्मदेव व महेश (शंकर) यात वादविवाद झाला. त्यावेळी पाच तोंडे असणार्‍या ब्रह्मदेवाची चार तोंडे वेद म्हणत तर पाचवे तोंड निंदा करीत असे. संतापलेल्या शंकराने ब्रह्मदेवाचे ते निंदणारे तोंड उडवले. ते तोंड शंकराच्या हाताला चिकटून बसले. त्यामुळे शंकराला ब्रह्महत्येचे पातक लागले. त्या पापापासून मुक्तता मिळवण्यासाठी शंकर ब्रह्मांडभर फिरत होते. एकदा सोमेश्वर येथे बसले असता, समोरच एक गाय व तिचा गोर्‍हा (नंदी) एका ब्राह्मणाच्या दारात उभा होता. त्यांच्या संवादात गोर्‍हा म्हणाला की, 'मी नाकात वेसण घालणार नाही, उद्या तो ब्राम्हण मला वेसण घालायला आल्यावर मी त्याला मारणार'. त्यावर त्याच्या आईने (गायीने) त्यास म्हटले, 'तू हे जर केलेस तर तुला एका ब्राह्मणाला मारल्याचे म्हणजेच ब्रह्महत्येचे पातक लागेल'. त्यावर तो नंदी म्हणाला, 'मला त्यावरचा उपाय माहीत आहे.' दुसर्‍या दिवशी ब्राह्मण गोर्‍ह्यास वेसण घालायला आला असताना, नंदीने त्याला शिंगाने हुसकले. त्यात त्या ब्राह्मणाला मृत्यू आला आणि नंदीचे शरीर काळे ठिक्कर पडले. आता पुढे काय होतेय हे उत्सुकतेने पाहत शंकर त्या नंदीच्या मागे जाऊ लागला. त्यानंतर त्या नदीने गोदावरीच्या पात्रातील (रामकुंडात) त्रिवेणी संगमावर येऊन स्नान केले. त्याबरोबर त्याचा मूळ शुभ्र रंग त्याला परत मिळाला.

ते पाहून शंकरानेही त्या त्रिवेणी संगमात स्नान केले. त्याबरोबर मागे लागलेल्या मस्तकापासून भगवान शंकराची सुटका झाली. त्याच गोदावरी काठावर एक मोठी टेकडी होती. त्या टेकडीच्या कपारात शंकर जाऊन बसले असता नंदीही तेथे आला. त्यावर 'तुझ्यामुळे माझी ब्रह्महत्येतून सुटका झाली, त्यामुळे यापुढे तू माझ्यासमोर बसू नकोस तू माझ्या गुरुसमान आहेस' असे शंकराने नंदीस सांगितले.

त्यामुळे शंकराच्या या मंदिरात नंदी नाही. जगातील हे असे एकमेव मंदिर आहे. तो नंदी रामकुंडात (गोदावरीतच) विसावला आहे, असेही मानले जाते. त्यावेळी शंकराने नंदीला सांगितल्यानुसार 12 ज्योर्तिलिंगानंतर 'कपालेश्वर' मंदिराचे महत्त्व आहे, असे सांगितले जाते.

WD
हे मंदिर टेकडीवर आहे. आता आजूबाजूला वस्ती झाली आहे. गावाच्या मध्यवर्ती भागात हे मंदिर आहे. पूर्वी येथे फक्त पिंड होती. पण पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि आजचे स्वरूप त्याला मिळाले. या मंदिराच्या पायर्‍या उतरून खाली आले की समोर गोदावरी नदी आहे. तेथेच प्रसिद्ध रामकुंड आहे. याच रामकुंडात भगवान रामाने आपल्या पित्याचे श्राद्ध केले होते. येथे इतरही बरीच मंदिरे आहेत.

कपालेश्वर मंदिराच्या समोरच गोदावरी नदीच्या पलीकडे प्राचीन सुंदर नारायण मंदिर आहे. हरिहर भेट महोत्सवाच्या वेळी कपालेश्वर व सुंदर नारायण या दोन्ही मंदिरातून अनुक्रमे शंकर व विष्णू या दोघांचे मुखवटे गोदावरी नदीवर आणले जातात. व त्यांची भेट घडवली जाते. तेथे त्यांच्यावर अभिषेक करण्यात येतो. यानिमित्ताने मोठा उत्सव होतो. याशिवाय कपालेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो. श्रावणी सोमवारीही या मंदिरात मोठी गर्दी असते.

जायचे कसे?

रस्ता मार्ग-
मुंबईहून नाशिक हे रस्तामार्गे १६० किलोमीटर आहे. पुण्याहून नाशिक २१० किलोमीटर आहे. दोन्ही ठिकाणांहून नाशिकला यायला भरपूर गाड्या आहेत.

रेल्वे मार्ग-
मुंबईहून नाशिकला यायला अनेक रेल्वेगाड्या आहेत.

हवाई मार्ग-
नाशिकसाठी जवळचा विमानतळ मुंबई, पुणे व औरंगाबाद आहे.