बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. लिटिल चॅम्प्स
Written By अभिनय कुलकर्णी|

'एसएमएस' जाहीर न करण्याचा सल्ला विचारांती'

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' च्या महाअंतिम फेरीत कार्तिकी गायकवाडला विजेती घोषित केल्यानंतर एसएमएस जाहीर न केल्यामुळे बरीच नाराजी व्यक्त झाली. झी मराठीचे प्रमुख नितिन वैद्य यांनीही त्यास पुष्टी दिली होती. मात्र, झीने त्यावर आता खुलासा केला असून मानसोपचार तज्ज्ञांसह अनेकांच्या सल्ल्याने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

इंदूर येथे झालेल्या कार्यक्रमात सूत्रसंचालक अतुल परचुरे यांनी हा खुलासा केला. इंदूरच्या सानंद न्यासातर्फे पाचही लिटिल चॅम्प्सचा कार्यक्रम सोमवारी (ता.२३) येथील अभय प्रशालमध्ये झाला. त्यावेळी परचुरे यांनी ही माहिती दिली. या कार्यक्रमात कोणत्या लिटिल चॅम्प्सला किती एसएमएस मिळाले हे झीने मुद्दाम जाहीर केले नव्हते. खरे तर महाअंतिम फेरीत कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर कोणाला किती एसएमएस मिळाले हे जाहीर करण्याची प्रथा आहे. मात्र, यावेळी ती बाजूला ठेवण्यात आली. तसेच कार्यक्रमानंतरही ते जाहीर करण्यात आले नाहीत. यामागची कारणमीमांसा करताना परचुरे म्हणाले, हा कार्यक्रम एक स्पर्धा असली तरी अंतिम टप्प्यात ती स्पर्धा उरली नव्हती. लोकांच्या भावना त्यात गुंतलेल्या होत्या. शिवाय या लिटिल चॅम्प्समध्येही परस्परांत भावबंध निर्माण झाले होते. एसएमएसची संख्या सांगून त्यांच्यात दुही पेरण्याचे अपश्रेय झी मराठीला नको होते. त्यामुळेच यासंदर्भात मानसोपचार तज्ज्ञ, अनेक मान्यवर यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनीही यामुळे या लहान मुलांवर परिणाम होईल, असे सांगून एसएमएस जाहीर न करण्याचाच सल्ला दिला.'

'झी' मराठीने हा सल्ला शिरोधार्य मानून एसएमएस जाहीर केले नाहीत, असे परचुरेंनी सांगितले. अर्थात, एसएमएस जाहीर कराचेच नव्हते, तर मग ते मागवले कशाला? लोकांचे पैसे हकनाक वाया गेले, अशी प्रतिक्रिया काहींनी कार्यक्रमावेळी व्यक्त केली.

झी मराठीचा हा निर्णय तुम्हाला पटतो काय? आपली मते खाली दिलेल्या चौकटीत व्यक्त करा.