रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. लिटिल चॅम्प्स
Written By अभिनय कुलकर्णी|

ऑटोग्राफ देताना छान वाटतं- रोहित राऊत

WDWD
लिटिल चॅम्प्समध्ये सगळ्यात 'रॉकींग परफॉर्मन्स' लातूरच्या रोहित राऊतचा असायचा. प्रेक्षकांनाही रोहित 'रॉक स्टार' म्हणूनच माहिती आहे. पण फार कमी जणांना माहिती आहे की रोहित आधी हिंदी सारेगमपमध्येही सहभागी झाला होता. तिथे त्याने शास्त्रीय संगीतावर आधारीतच गाणी गायली होती. त्यामुळे या स्पर्धेत त्याने जाणीवपूर्वक इतर गाण्यांकडेही लक्ष दिले.

आता स्पर्धा संपल्यानंतर पुढे काय? असे विचारल्यावर रोहित म्हणाला, आता मला सगळं काही नीट मार्गी लावायचंय. गेल्या अनेक दिवसांपासून मी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घ्यायला मुकलो आहे. ते पुन्हा नीट सुरू करायचं आहे. शास्त्रीय संगीताकडे नीट लक्ष द्यायचं आहे. अपेक्षांचं दडपण येतं का असं विचारल्यावर 'नाही, असं तो स्पष्टपणे सांगतो. मी दडपण घेणार्‍यातला नाही, हेही नमूद करतो.

रोहित अत्यंत चळवळ्या आहे. दिवसभर तो बिझी असतो. सकाळी पाचला त्याचा दिवस सुरू होतो आणि त्यानंतर झोपेपर्यंत तो कुठल्या ना कुठल्या क्लासमध्ये असतो. मग यात गाणं सांभाळतो कसं असं विचारल्यावर यातूनही मी वेळ काढतो असे तो सांगतो.

सारेगमप स्पर्धेच्या माध्यमातून अवधूत गुप्ते, सोनू निगम, शंकर महादेवन, कैलास खेर या मोठ्या गायकांचं मार्गदर्शन त्याला मिळालं. ही मंडळी आजही त्याच्या संपर्कात आहेत. काहीही अडचण आली की तो त्यांना विचारतो. परफॉर्मन्स तू चांगला देतोस. याची प्रेरणा कुणाकडून घेतलीस हे विचारल्यावर त्याने हीच नावं सांगितली. हे सर्व गायक उत्तम परफॉर्मर आहेत. त्यामुळे ते काय करतात हे पाहून मी माझी स्वतःची स्टाईल डेव्हलप करतो, असेही त्याने सांगितले.

'सारेगमप'ने प्रसिद्धी खूप दिली. पण त्यामुळे सेलिब्रेटी झाल्याचा त्रास होत नाही का? यावर मी 'सेलिब्रेटी' आहे हे इतरांना वाटते. मी पूर्वीसारखाच आहे, हेही तो आवर्जून सांगतो. दोस्तांबरोबर तो आजही क्रिकेट खेळायला जातो. त्यावेळी त्याला त्याचे दोस्तही तो 'सेलिब्रेटी' आहे हे जाणवून देत नाही. मात्र, लोक ऑटोग्राफ मागायला येतात, त्यावेळी छान वाटतं, हे सांगायलाही विसरत नाही.