आशीर्वाद म्हटलंय खरं, पण ते केवळ वयाच्या अधिकाराने. कर्तृत्वाच्या नाही. हे पत्रही आशीर्वादपरही नाही. ही आहे कृतज्ञता. तुम्ही आमचं जगणं सुरेल केलंत, याविषयीची.
एरवी झी मराठी पहायचं ते सासू-सून आणि कौटुंबिक संघर्षांच्या मालिकांसाठी, नाही तर वहिन्यांच्या फुगड्या पाहण्यासाठी. नशिब आमचं. पण कुठला तरी सुखद योग जुळून आला नि सारेगमप हा सुरेल कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रमांच्या गर्दीत तो बरा वाटला. रियालिटी शो. पण हा मराठी होता. म्हणून बघत गेलो. पर्वामागून पर्व उलटत गेली आणि एके दिवशी घोषणा झाली लिटिल चॅम्प्स पर्वाची.
ND
ND
आता हे काय नवीन, म्हणून आम्ही पहिल्या दिवसापासून थोड्या उत्सुकतेने आणि काहीशा अविश्वासानेच हा शो पहायला सुरवात केली. अविश्वास यासाठी की तुम्ही चिमुरडे दिग्गजांची गाणी कशी गाणार म्हणून. पण पहिल्या दिवशीच हा कार्यक्रम बघितला नि आमच्या ओठांचा झालेला चंबू आजही सुटलेला नाही. मग सोमवार आणि मंगळवार हे दोन दिवस साडेनऊ ते अकरा हे तुमच्यासाठी जणू 'बुक' होऊन गेले. या दिवशी सगळी कामं आटोपून आम्ही पण घरी लवकर येऊ लागलो. घरातल्या बायकाही जेवणखाण आटोपून टिव्हीसमोर बसू लागल्या. वयोवृद्ध आजी-आजोबांना तर आयुष्याच्या संधीकाली 'सुरेल भेट' मिळाली. आयुष्याला एक वेगळाच 'ताल' आला. आठवड्यातले हे दोन दिवस आम्ही सर्व सुरांच्या हिंदोळ्यावर हिंदळत असू. तुमच्या गाण्याइतकंच पल्लवी जोशीचं मधाळ सूत्रसंचालन, अवधूत नि वैशालीची खट्याळकीत आम्हीही नकळत सहभागी होऊन गेलो. नि कार्यक्रमाचा 'चाबूक' निकष आमच्या मनात पक्का झाला.
स्पर्धा सुरू झाली नि उत्सुकता वाढू लागली. नवनवीन स्पर्धक येऊ लागले नि मनात घर करू लागले. प्रत्येकाचं वेगळेपण पाहून मन हरखून जायचं. तुमची तयारी, समज पाहू थक्क व्हायला व्हायचं. मग पुढचा भाग बघायची उत्सुकताही दाटून यायची. मंगळवारनंतर वेध लागायचे ते पुढचा सोमवार कधी येतो त्याचे. प्रत्येक सोमवारगणिक कुणी ना कुणी स्पर्धेतून बाद व्हायचे. त्यावेळी फार वाईट वाटायचं. शेवटी बारा स्पर्धक राहिल्यानंतर तर मन घायकुतीला यायचं. आता तर कुणीही स्पर्धेतून जाऊ नये असं वाटायचं. तरीही गोव्याची नेहा, रत्नागिरीची शमिका, मुंबईची शाल्मली आणि अवंती स्पर्धेबाहेर गेल्यानंतर खट्टू व्हायला झालं. नियमांनी कार्यक्रमाला बांधून ठेवल्यानं हे होणं अपरिहार्य होतं. पण शेवटी पाच स्पर्धक उरले. तेव्हा मात्र आमचा बांध सुटला आणि आम्ही झी मराठीला आमच्या तीव्र भावना कळवल्या आणि अखेरीस अंतिम फेरीत तुम्हा पाच जणांची निवड झाली.
तोपर्यंत खुल्या आवाजाची कार्तिकी, आर्याचा 'आशास्वर', रोहितचा 'रॉकिंगनेस', प्रथमेशचा अध्यात्मिक सूर आणि मुग्धाने छेडलेले लडिवाळ स्वर कानात रूणुझुणू वाजू लागले होते. त्यामुळे पुढच्या क्रमवारीत आम्हाला रस नव्हताच मुळी. कार्तिकी विजयी होणं ही औपचारिकताच होती. कार्तिकीही किती समजूतदार. विजयी झाल्यानंतरही मी या सगळ्यांची प्रतिनिधी म्हणून किती 'मोठ्ठ्यां'सारखं बोलली ती. तुम्हीही किती खुल्या मनानं तिचं कौतुक केलंत. वाटलं तु्म्हा सार्यांची 'दृष्ट' काढून टाकावी.
आता हा कार्यक्रमही संपलाय नि एक अनामिक हुरहुरही मनात दाटून आलीय. आता यापुढच्या प्रत्येक सोमवारी साडेनवाची वाट पाहिली जाईल. पण टिव्हीवर तुम्ही नसाल. एक रिक्तपण जाणवत राहिल. ते जाणवायला लागलंही आहे. हे सहा महिने तुम्ही आमचं आयुष्य सुरेल केलंत. आमच्या विवंचना विसरायला लावल्या. आर्थिक मंदी, दहशतवादी हल्ले नि काय काय या काळात सुरू होतं. पण त्यात तुमचा स्वर ही सुरेल फुंकर होती. आता हे सारं संपलं. आमचं ठीक आहे. आम्ही यापुढेही तुम्हाला ऐकत राहू. पण पण ज्यांनी आयुष्याचे सहा महिने तुमच्या भरवशावर काढले त्या वृद्धांनी काय करायचं? त्यांच्यासाठी हा काळ कठीणच असेल. त्यांच्या रोजच्या आयुष्यातल्या जखमांवरचं औषधच आता संपून गेलंय.
तरीही, आम्हा सगळ्यांच्या आयुष्याला तुम्ही जो 'ताल' दिलात त्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत. हे ऋण कितीही काहीही केलंत तरी फिटणार नाहीत, याची कल्पना आहे मला. म्हणूनच हे ऋण आम्ही आनंदाने आमच्या डोक्यावर ठेवू.
तुमच्या सांगितिक कारकिर्दीला अगदी मनःपूर्वक शुभेच्छा.