मी समुद्राच्या पाण्याचा थेंबही नाही-कार्तिकी
तुम्ही आम्हाला सेलिब्रेटी म्हणता. पण आम्ही मोठे झालेलो नाही. संगीताच्या समुद्रातील आम्ही थेंबही नाही, असे आम्हाला वाटतं, हे चिमुरडी कार्तिकी गायकवाड म्हणते तेव्हा ती लहान आहे हे पटत नाही. 'लिटिल चॅम्प्स' पर्वाची महाविजेती असलेली कार्तिकी उत्तम गायिका तर आहेच, पण या लहान वयातच गाण्याने आणि विचारांनाही बरीच पक्व झालेली आहे. म्हणूनच 'मी विजेती झाली ही औपचारीकता आहे. खरं तर आम्ही सर्व विजेतेच आहोत, अशी माझी भावना आहे, हे तिचे सांगणेही तिच्या या वैचारिक परिपक्वतेचे उदाहरण दाखवून देणारे आहे. '
सारेगमप'चे पर्व संपल्यानंतर आता आयुष्याची खुली स्पर्धा सुरू झालीय. पण कार्तिकीला तिचे भय नाही. या स्पर्धेनेच दिलेली शिदोरी तिच्यासाठी एवढी मोठी आहे, की त्याबळावर आयुष्यात पुढे वाटचाल सहज करता येईल, असे तिला वाटते. हा प्रवास सोपा नाही, याचीही तिला कल्पना आहे. लोकांच्या अपेक्षाही खूप आहेत. त्या अपेक्षांची पूर्तीही करायची आहे. पण त्यासाठी संगीताचा ध्यास कायम ठेवावा लागेल आणि रियाज वाढवावा लागेल हे तिचे उत्तर आहे. कार्तिकीच्या या स्वरप्रवासात तिचे संगीतकार वडिल कल्याणजी गायकवाड यांचेही मोठे योगदान आहे. प्रत्येक गाण्याची प्रॅक्टिस तिचे वडिल करून घेत होते. कार्तिकीने या स्पर्धेत वडिलांची बरीच गाणी गायली. कल्याणजी स्वतः संगीतकार आहेत. पण कार्तिकीच्या गाण्यांमुळे त्यांची गाणी जनसामान्यांपर्यंत पोहोचली. याविषयी स्वतः बोलताना कार्तिकी म्हणाली, बाबांचे संगीतधन आतापर्यंत वारकर्यांपर्यंत मर्यादीत होते. पण मी मुद्दामहून त्या रचना गायल्या. आता त्या बर्याच लोकांपर्यंत पोहोचल्या. मला त्याचा खूप आनंद आहे.' सारेगमप'च्या कार्यक्रमाने आपल्याला खूप काही दिल्याची तिची भावना आहे. ती म्हणते, मला गाण्यात जे पाहिजे होतं ते मिळालं. अनेक गोष्टी समजल्या. स्वप्नात ज्यांना भेटणेही कठीण अशी मोठी माणसे पहायला मिळाली. त्यांच्याकडून काही घेता आलं. म्हणूनच स्पर्धेतून जेव्हा मी बाहेर पडले होते. तेव्हा हे सगळं सुटणार म्हणून मला वाईट वाटलं होतं. विजेतेपद मिळवता येणार नाही, याचं दुःख मला कधीच नव्हतं. म्हणूनच कॉल बॅक एपिसोडसाठी पल्लवीताईकडून फोन आला तेव्हा मला अतिशय आनंद झाला. त्याही एपिसोडमध्ये मी माझं उत्तम ते द्यायचं ठरवलं होतं. महाविजेती झाल्यानंतर आळंदीत मोठी मिरवणूक काढण्यात आली. कार्तिकीला रथात बसविले होते. तब्बल दीड-दोन किलोमीटरची गर्दी होती. दीडशे किलो पेढे वाटले गेले. पण हे प्रेम तिला केवळ आळंदीतच मिळाले असे नाही. महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेरही जिथे मराठी ऐकली वा बोलली जाते अशा सर्व ठिकाणच्या लोकांनी तिच्यावर तितकेच प्रेम केले. पण या प्रेमाची, आपल्याकडून असलेल्या अपेक्षांची तिला भीती वाटत नाही. गाणे अजून पक्के करण्यासाठी शास्त्रीय संगीताचा पाया पक्का करण्याचा तिचा मानस आहे. त्यासाठी हवा तेवढा रियाज करण्याची तिची तयारी आहे.