रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. लिटिल चॅम्प्स
Written By अभिनय कुलकर्णी|

शास्त्रीय संगीतावरच यापुढेही भर देईन- प्रथमेश

WDWD
प्रथमेश लघाटे हा लिटिल चॅम्प्स संगीतासाठीच जन्माला आलाय हे पल्लवी जोशीपासून अनेक दिग्गजांचं म्हणणं अगदी खरं आहे. तो सूर लावतो तोच इतका सच्चा की अध्यात्मिक अनुभूती यावी. त्याच्या सुरांमधून जणू ईश्वर बोलतोय असं वाटतं. त्याच्याशी बोलतानाही हीच भावना जाणवते. 'लिटिल चॅम्प्स'चं यश आभाळाला भिडणारं असलं तरी आता त्यामुळे मिळणारी प्रसिद्धी आता जमिनीवर बसू लागली आहे. पण प्रथमेशचे पाय जमिनीवरच घट्ट आहे. या कार्यक्रमाने दिगंत किर्ती मिळाली असली तरी प्रथमेशचे आयुष्यध्येय नक्की झालंय, 'शास्त्रीय संगीतात करीयर करायचं'.

पण मग या प्रसिद्धीचं लोकांकडून ठेवल्या जाणार्‍या अपेक्षांचं दडपण नाही वाटत? या प्रश्नाला तो एखाद्या तत्वज्ञासारखा उत्तर देतो, ' मला माहितेय माझा प्रवास सोपा नाही. माझ्याकडून काहीही चुक झाली तरी लोक ते सहन करणार नाहीत. अपेक्षांचं ओझं माझ्यावर आहे. त्यामुळे खडतर प्रवास करावा लागणार. रियाजावर अतिशय भर द्यावा लागणार. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा ही माझ्यासाठी एक कसोटी निश्चित करून तिला न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन'.

सारेगमपच्या लिटिल चॅम्प्स पर्वाची महाविजेती म्हणून कार्तिकी गायकवाडचं नाव घोषित झालं त्यावेळी तुझी प्रतिक्रिया काय होती, असं विचारल्यानंतर प्रथमेश चटकन म्हणतो, मला अतिशय आनंद झाला. आम्ही सर्वच चांगले गात होतो. पण स्पर्धेसाठी कुणी एक विजेता निवडायचाच होता. कार्तिकी विजेती ठरली. पण खरं तर मी स्पर्धा जिंकण्या-हरण्याचा कधीही विचार केला नव्हता. कारण आम्ही सर्वच विजेते आहोत, असेच मला वाटते. शिवाय केवळ विजेता ठरल्याने पुढच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी लागणारी मेहनत, कष्ट कमी होतील असे नाही. त्यामुळे स्पर्धा जिंकणे हा केवळ एक टप्पा झाला. पुढे अजून बरेच काही बाकी आहे.

प्रथमेशने स्पर्धेत सर्व प्रकारची गाणी गायली तरी शास्त्रीय संगीताची आवड स्पष्टपणे जाणवली. रागदारीवर आधारीत नाट्यगीतं, भजनं म्हणताना तो जास्त खुलत होता. याचं कारण शास्त्रीय संगीत त्याची मूळ आवड आहे. त्याला करीयरही शास्त्रीय संगीतातच करायचंय. त्यासाठी कितीही मेहनत घ्यायची त्याची तयारी आहे. पण मग सुगम संगीत गाणार नाही का असं विचारल्यावर तो पटकन म्हणाला, नाही त्याचा अर्थ असा नाही. सुगम संगीतातही रागदारीवर आधारीत गाणी असतातच की. ती गाऊन मी सुगम संगीताचा आनंद लुटेन असं तो म्हणतो.

'सारेगमप'च्या या पर्वाने बरेच काही दिले अशी प्रथमेशची भावना आहे. तो म्हटला, रियालिटी शो याआधीही बरेच झाले. होत आहेत. पण हा वेगळा आहे. यात खर्‍या अर्थाने गुणवत्तेला संधी मिळते. आम्हालाही या काळात खूप काही शिकायला मिळालं. संगीत तर आम्ही शिकत होतोच, पण त्यातले अनेक बारकावे, तांत्रिक गोष्टी इथं आल्यावर कळल्या. गाणं कमी वेळात कसं मांडावं हे तंत्रही कळलं.'

कार्यक्रमाने आपल्याला एका विशिष्ठ उंचीवर नेलं, असं तो म्हणातो. अर्थात ही उंची गाठूनही तो गुरूंना विसरलेला नाही. 'गुरूबिन ग्यान कहॉंसे लाऊ' ही भावना त्याच्या मनात आजही आहे. गप्पागोष्टीत त्याने गुरूंचाही आवर्जून उल्लेख केला. 'गुरू सतीश व वीणा कुंटे' यांच्या मार्गदर्शनाविना एवढा पल्ला गाठणे शक्य नव्हते, असे सांगून गुरूंविषयीची कृतज्ञता त्याने व्यक्त केली.

आता पुढचा काळ सगळा रियाझात आणि तयारीत घालवायचा आहे. लिटिल चॅम्प्सचे हे पर्व आटोपल्यानंतर तो विश्रांती घेऊन या तयारीला लागणार आहे.