गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी साहित्य संमेलन-०८
Written By वेबदुनिया|

सांगलीतील १९४३ मधील साहित्य संमेलन

सांगलीत होत असलेले ८१ वे साहित्य संमेलन हे येथे होत असलेले दुसरे संमेलन आहे. यापूर्वी १९४३ मध्ये साहित्य संमेलन भरले होते. दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक व अस्पश्योद्धारासाठी कळकळीने प्रयत्न करणारे श्री. म. माटे या संमेलनाचे अध्यक्ष होते. साहित्य क्षेत्रात त्यावेळी माटे यांचे नाव फार मोठे होते. अस्पृश्यांसाठी रात्रशाळा काढून त्यांच्या शिकविण्याची व्यवस्था करणाऱ्या माटे यांनी लिहिलेला अस्पृश्यांचा प्रश्न हा ग्रंथ फार गाजला. पण त्याचवेळी उपेक्षितांचे अंतरंग, माणुसकीचा गहिवर हे त्यांचे ग्रामीण कथासंग्रह चांगलेच प्रसिद्धीस पावले होते. त्यांनी अनेक ग्रंथांचे संपादनही केले होते. वैचारीक वाड़मय त्यांनी बरेच लिहिले. ग्रामीण कथा मराठी साहित्यात रूजविण्यात त्यांचे योगदान मोठे होते.

सांगली येथे झालेल्या ४३ मध्ये भरलेल्या २८ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले होते, की गृहस्थाश्रमावर श्रद्धा उत्पन्न करील असे वाड़मय तयार करणे अत्यवश्यक आहे, असे संतवाड़मय वाचताना अनेकदा वाटते. प्रपंचावरची श्रद्धा उठविणारे वाड़मय जर समाजात सुखाने व आदर पावून नांदते तर ती श्रद्धा भक्कम करणारे वाड़मय समाजात आग्रहाने उत्पन्न केले पाहिजे. हे कोणीतरी करावयास हवे. रामदासांनी जे प्रपंचविज्ञान निर्माण केले, पण त्यांचे विचार त्यांच्या वाड़मयात इतस्ततः पसरलेले आहेत ते विचार अवचय पद्दतीने एकत्र करून जर कोणी सलग करून दिले तर त्याचा उपयोग फार आहे. तेव्हा हे कोणी तरी करावे. कोणी लेखकांनी जर रामकृष्णाची मानवी रूपे यथातथ्य व सादर बुद्धीने स्प्ष्ट करून सांगितली व अद्भुतावर भक्ती ठेवण्याऐवजी त्यांच्या मानवी गुणप्रकर्षावर मन लुब्ध व्हावे हे दाखवून दिले तर समाजाला ते फारच उपकारक होईल. म्हणून माझे म्हणणे असे आहे की, नवे राजकारण असले काय नवे अर्थवाद असले काय किंवा नवीन वाड़मय असली काय, आमच्या सर्व विचारवंतांचा मोहरा अगदी घसघशीतपणे स्वकीयांकडे वळला पाहिजे. त्यांनी आपल्या समाजाचे अवलकोकन करावे आणि ते सहानुभूतीने करावे. या समाजाच्या थराथरातून आपले मन सहानुभूतीने खेळत ठेवल्यास अगदी जिवंत वाड़मये वाटेल तितकी निर्माण होतील.