गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. साहित्य संमेलन २००९
Written By वेबदुनिया|

महाराष्ट्र साहित्य परिषद

मराठी भाषा आणि साहित्य यांची जपणूक, विकास व प्रसारासाठी ज्या संस्था सातत्याने कार्यरत आहेत, त्यापैकी सर्वात आद्य संस्था म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद. त्या दृष्टीने म.सा.प.ही ज्येष्ठ आणि प्रातिनिधिक साहित्य संस्था आहे. १९०६ साली पुणे येथे चौथ्या ग्रंथकार संमेलनात या संस्थेची स्थापना झाली. त्या पूर्वी साहित्य प्रसाराचे काम सार्वजनिक ग्रंथालयांमार्फत चालत असे. एकोणिसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात आपल्या येथे इंग्रजी राजवट सुरु झाली आणि विविध ज्ञान शाखांची ओळख आपल्याला झाली. मुद्रण कला, आधुनिक शिक्षण, विद्यापीठे, रेल्वे, पोस्ट, तारायंत्र, छापखाने, वृत्तपत्रे, ग्रंथ छपाई इ. नवीन उपक्रमांची ओळख जनतेला झाली. नव शिक्षितांची पिढी नव्या जोमाने तयार झाली. मुंबईचे बाळशास्त्री जांभेकर, दादाभाई नौरोजी, दादोबा पांडुरंग, विष्णुबुवा ब्रह्मचारी इ.विद्वान आणि पुण्यातील लोकहितवादी, महात्मा फुले, चिपळूणकर पितापुत्र, न्यायमूर्ती रानडे, टिळक, आगरकर अशांसारखे समाजधुरीण नव विचार घेऊन पुढे आले. मराठी ग्रंथ प्रसाराच्यादृष्टीने मोलाचे काम गोपाळ हरी देशमुख आणि न्या.महादेव गोविंद रानडे यांनी निष्ठेने केले. लोकहितवादींनी पूना नेटिव जनरल लायब्ररी (सध्याचे लक्ष्मी रोड वरचे पुणे नगर वाचन मंदिर) ची स्थापना १८४८ साली केली. त्यापूर्वी अहमदनगरला मिशनऱ्यांनी महाराष्ट्रातील पहिले ग्रंथालय सुरू केले होते. मुंबई, नाशिक, रत्नागिरी, ठाणे इथेही एकोणिसाव्या शतकात ग्रंथालये सुरू झाली होती.

छापखान्याची कला माहीत झाल्याने पुस्तकेही प्रकाशित होऊ लागली. त्यांपैकी ठळक पुस्तके सांगायची झाल्यास, यमुना पर्यटन - बाबा पदमनजी (१८६३), ल.मो.हळबे कृत मुक्तामाला (१८६१), मोरोबा कान्होबा कृत घाशिराम कोतवाल (१८६३) गो.ना.माडगावकर कृत मुंबईचे वर्णन (१८६३) अशी सांगावी लागतील.

आधी अनुवादित आणि नंतर स्वतंत्र पुस्तक निर्मिती बरोबरच मराठीतील दर्पण प्रभाकर. ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश, निबंधमाला, मासिक मनारंजन, विविधज्ञानविस्तार इ.महत्त्वाची नियतकालिके प्रसिद्ध होऊ लागली. या सर्व बाबी ग्रंथ निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या होत्या. मुद्रण कलेमुळे एकोणिसाव्या शतकात फार मोठी वैचारिक क्रांती झाली. महात्मा जोतिबा फुले, न्या.रानडे आदी विचारवंत नेते सर्वच बाबतीत नवे विचार पेरत होते. प्रबोधन युगच अवतरले होते. तात्विक वादविवाद झडत होते. या वादविवादांची परिणती विधायकतेकडे वळावी यासाठी लोकहितवादी आणि रानडे जागरूक होते. १८७८ साली त्यांनी ग्रंथकार संमेलन भरवले. समाज जागृतीबरोबरच सामाजिक ऐक्य साधणे हा या संमेलनाचा हेतू होता. त्या आधी पुण्यात पुणे सार्वजनिक सभा १८७० मधे स्थापन झाली होती. तिच्या पाठोपाठ वक्तृत्त्वोतेजक मंडळी, सत्यशोधक समाजाचीही स्थापना झाली होती. याच बरोबर दर्जेदार वाङ्मय निर्मितीही होत होती. या साऱ्या घटना आणि प्रसंगांची पार्श्वभूमी ग्रंथकार संमेलनाला लाभली होती.

१८६५ साली न्या.रानडे यांनी मराठीत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचा आढावा घेतलेला दिसतो. त्यानुसार ४३१ गद्य आणि २३० पद्य पुस्तकांची निर्मिती झाल्याचे दिसते. ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्या.रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने १८७८ च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञान प्रकाश (७ फेब्रुवारी १८७८) मधे प्रसिद्ध झाले आणि या आवाहनानुसार ११ मे १८७८ रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. संमेलनाध्यक्ष पद न्या.रानडे यांनीच भूषविले. दुसरे ग्रंथकार संमेलन १८८५ साली पुण्यातच भरले. या संमेलनाला पहिल्याच्या मानाने चांगली म्हणजे शे सव्वाशे नामवंत ग्रंथका्रांनी उपस्थिती लावली होती. २१ मे १८८५ रविवार, दुपारी ४ वाजता पुणे सार्वजनिक सभेच्या (दाणे आळी, बुधवार पेठ) जोशी हॉल मधे हे संमेलन भरले होते.

या नंतर जवळ जवळ वीस वर्षांनी तिसरे ग्रंथकार संमेलन १९०५ च्या मे मधे सातारा येथे भरले. लो.टिळकांचे एक सहकारी साताऱ्यातले सुप्रसिद्ध वकील र.पां.ऊर्फ दादासाहेब करंदीकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते. २३ मे च्या केसरीत या संमेलनाचा त्रोटक वृत्तांत प्रसिद्ध झाला होता. साताऱ्या पाठोपाठ चौथे ग्रंथकार संमेलन पुणे येथे २७ मे १९०६ शनिवार, रविवार रोजी सदाशिव पेठेत नागनाथपाराजवळच्या मयेकर वाड्यात भरले होते. हे संमेलन आधीच्या संमेलनांपेक्षा यशस्वी झाले, विधायक स्वरूपाचे झाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी, ग्रंथकार आणि भाषांतरकार गोविंद वासुदेव कानिटकर होते. त्या वेळची अनेक मान्यवर ग्रंथकार मंडळी संमेलनासाठी एकत्र आलेली होती. निबंध वाचन, भाषणे, ठराव यामुळे संमेलन दोन दिवस गाजले.

याच संमेलनात मराठी जुने ग्रंथ व लेख सुरक्षित ठेवण्याकरीता एक गृह बांधण्याची जाहीर सूचना प्रथमच महादेव राजाराम बोडस या विद्वानाने मांडली. वऱ्हाडचे वा.दा.मुंडले यांनी ऐतिहासिक कागदपत्रांच्या जपणुकीसाठी एखादी सुरक्षित जागा हवी असा विचार मांडून त्यासाठी स्वत:ची रु.५०/- देणगी जाहीर केली. योगायोग असा की, दोन्ही सूचना पाच सहा वर्षांनी पुण्यातच फलद्रुप झाल्या. मुंडल्यांची सूचना १९१० साली भारत इतिहास संशोधनाच्या स्थापनेमुळे साकार झाली. तर बोडसांची सूचना प्रस्तुत संमेलनाच्या समारोपाच्या वेळी साहित्य परिषद स्थापन झाल्याच्या घोषणेने झाली. पांगारकरांनी परिषदेच्या स्थायी स्वरूपाच्या संस्था स्थापन होण्यास उत्तेजन म्हणून स्वत:ची ५०/- रुपयांची देणगी जाहीर केली. याच संमेलनात लो.टिळकांचे मासिक पुस्तके व वर्तमानपत्रे यांच्याद्वारे मराठी भाषेची झालेली वाढ या विषयावर भाषण झाले होते. संमेलनातील काही भाषणात साहित्य परिषदेच्या स्थापनेविषयीचे विचार मांडले गेल्यामुळे समारोपाच्या आधी साहित्य सम्राट न.चिं.केळकरांनी साहित्य परिषद स्थापण्यात आली असून त्यासाठी साठ सभासद मिळाले आहेत अशी घोषणा केली. परिषदेच्या चिटणीसांच्या जागी ठाण्याचे महाराष्ट्र कवी चे संपादक वि.ल.भावे, रा.कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, रा.वासुदेव गोविंद आपटे यांना नेमल्याविषयी जाहीर केले. या घोषणेला पाठिंबा देण्यासाठी लो.टिळकांनी आशिर्वादपर भाषण केले. त्यांच्या भाषणात त्यांनी उद्गार काढले, केवळ उत्कट इच्छेने कामे होत नसतात, तर कर्ते पुरुष पुढे यावे लागतात, हे वाक्य मनी धरून संमेलनाच्या समारोपानंतर तिघे चिटणीस कामाला लागले.

विशेष उल्लेख वा.गो.आपट्यांचा करायला हवा. ते आनंद या बाळगोपाळांच्या मासिकाचे संपादक आणि संवर्धक या नात्याने विख्यात आहे. कलकत्ता विद्यापीठातून ते पदवीधर झाले होते. वंग भाषेचे जाणकार होते. वंगीय साहित्य परिषदेचे कामकाज त्यांनी जवळून बघितले होते. त्या धर्तीवर साहित्य परिषदेचे कामकाज व्हावे असे त्यांना वाटत होते. रामानंद, रवींद्रनाथांशी त्यांचा परिचय होता. अशोक चरित्र (१८९८), मराठी शब्द रत्नाकर (१९२०) या दोन ग्रंथांमुळे त्यांचे नाव साहित्य जगतात सर्वश्रुत झाले होते. ते साहित्य परिषदेचे संस्थापक चिटणीस होते. १९१२ साली पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत साहित्य परिषद या विषयावरच त्यांचे व्याख्यान झाले होते. परिषदेच्या द.वा.पोतदार कृत इतिहास ग्रंथात हे व्याख्यान छापलेले आहे. (१९४३ आ.)

१० जुलै १९०६ च्या केसरीत आपटे, भावे व खाडिलकर यांच्या सहीने मराठी भाषेच्या अभिमान्यांना उद्देशून एक विनंतीपत्र प्रसिद्ध करण्यात आले होते. या पत्रात परिषदेची उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली होती, तिने हाती घेतलेल्या नऊ कामांची जंत्री देण्यात आली. यात परिषदेची वार्षिक १ रु.वर्गणी भरून सभासद होण्यासाठीचे आवाहनही केले होते. नऊ कलमातील पहिले कलम मराठी ग्रंथकारांची व लेखकांची आता वेळोवेळी परिषद भरवून परस्परांतील परिचय वाढविणे व त्यांच्या अडचणी काय आहेत ते समजावून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न करणे असे आहे. हे फार महत्त्वाचे आहे. परिषदेतर्फे साहित्य संमेलने भरविण्याचा या कलमात स्पष्ट निर्देष आहे. चौथ्या कलमात साहित्य चर्चा करण्याकरीता साधल्यास एखादे मासिक किंवा त्रैमासिक काढण्याचेही सूतोवाच करण्यात आलेले आहे. परिषदेतर्फे पुढे दहा वर्षांनी महाराष्ट्र साहित्य पत्रिका निघाली त्याचे मूळ वरील गोष्टीत आहे.

अशा रीतीने २७ मे १९०६ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेची पुणे येथे स्थापना झाली. आपटे, भावे, खाडिलकर हे तिघेही ग्रंथकार चिटणीस म्हणून काम बघू लागले. ग्रंथकार संमेलन या नावाचा पुढे मात्र लोपच झाला.