उरलेल्या चपातीपासून बनवा असा कुरकुरीत नाश्ता, मुलं पुन्हा पुन्हा मागून खातील!
उरलेली चपाती फेकून देण्यापेक्षा किंवा तीच चपाती पुन्हा गरम करून खाण्यापेक्षा, तिचा 'कुरकुरीत मसाला चिप्स' किंवा 'चपाती नूडल्स' बनवणे हा एक भारी पर्याय आहे.आज आपण उरलेल्या चपातीपासून चहाच्या वेळेसाठी अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत 'मसाला चपाती चिप्स' कसे बनवायचे ते पाहूया.
साहित्य-
उरलेल्या चपात्या
लाल तिखट- १ छोटा चमचा
चाट मसाला- १ छोटा चमचा
मीठ चवीनुसार
तेल
कढीपत्ता ५-६ पाने
कृती-
सर्वात आधी चपाती कापून घ्या, सर्वप्रथम उरलेल्या चपात्यांचे शंकरपाळ्यासारखे छोटे चौकोनी तुकडे किंवा पिझ्झासारखे त्रिकोणी तुकडे करून घ्या. आता कढईत तेल गरम करा. तेल चांगले तापले की त्यात चपातीचे तुकडे टाकून मध्यम आचेवर तळून घ्या. जर तुम्हाला जास्त तेल नको असेल, तर तुम्ही तव्यावर थोडे तेल टाकून हे तुकडे खरपूस भाजू शकता. चपातीचे तुकडे कुरकुरीत आणि सोनेरी रंगाचे झाले की ते एका कागदावर काढून घ्या. आता एका बाऊलमध्ये तळलेले तुकडे घ्या. त्यावर लाल तिखट, चाट मसाला आणि मीठ टाका. सर्व तुकड्यांना मसाला व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने बाऊल हलवून मिक्स करा. तसेच तुम्हाला हवे असल्यास थोडे तेल गरम करून त्यात कढीपत्ता आणि चिमूटभर हिंग टाकून ही फोडणी चिप्सवर घालू शकता. हे कुरकुरीत चिप्स तुम्ही हवाबंद डब्यात साठवून ठेवल्यास २-३ दिवस छान राहतात.
इतर काही भन्नाट पर्याय
चपाती नूडल्स-
चपातीचे लांब काप करा नूडल्ससारखे. कढईत कांदा, कोबी, सिमला मिरची आणि सॉस (Soya/Chilli) टाकून हे काप परता. मुलांसाठी हा उत्तम नाश्ता आहे.
चपाती पिझ्झा-
चपातीवर सॉस लावा, त्यावर भाज्या आणि चीज किसून टाका. तव्यावर झाकण ठेवून चीज विरघळेपर्यंत गरम करा.
चपाती लाडू-
चपातीचा मिक्सरमधून चुरा करा. त्यात गूळ, तूप आणि सुका मेवा घालून त्याचे लाडू वळा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik