नागपंचमी स्पेशल रेसिपी डाळ बाटी
श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण नागपंचमी आहे. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, भाज्या चिरत नाही, तवा चुलीवर ठेवत नाही, असे काही नियम पाळत असतात. अशात या दिवशी जेवायला काही तरी वेगळं आणि स्वादिष्ट करायला हवं हे ही तेवढंच खरं. मग पाहू या जर तवा वापरायचा नाही तर ह्या नागपंचमीला आपण स्वयंपाकात काय स्वादिष्ट डिश तयार करू शकता...
दाल बाटी
साहित्य: एक किलो गव्हाचे जाडं पीठ, 1 टेबलस्पून दही, मीठ चवीप्रमाणे, तेल (मोहन), चिमूटभर सोडा, अर्धा लहान चमचा हळद, 1 वाटी तूर डाळ, फोडणीचे साहित्य.
कृती: बाटी बनविण्यासाठी परातमध्ये गव्हाचे जाडं पीठ, दही, मीठ, चिमूटभर सोडा, थोडीशी हळद आणि मोहन टाकून कोमट पाण्याने घट्ट मळून घ्या. लाडू एवढ्या आकाराचे गोळे तयार करून त्यांना 10 ते 15 मिनिटे वाफवून घ्या. (उकळलेल्या पाण्यात गोळे टाकून वर येईपर्यंत शिजवू पण शकता.) बाट्या बाहेर काढून 5 मिनिटे तसेच राहून द्या. ओव्हन गरम करून किंवा मायक्रोवेव्हमध्ये ठेवून बाट्या दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी होयपर्यंत शेकून घ्या. शेकून झाल्या की थोडं गार होऊ द्या, मग हाताने तोडून त्यात भरपूर साजुक तूप घाला. आपल्या आवडीप्रमाणे तूर डाळची आमटी तयार करून त्याबरोबर बाटी सर्व्ह करा.