"केवळ स्वादिष्टच नाही, तर ती आरोग्यदायी फायद्यांचा खजिना: हिंग कचोरी"
हिंग कचोरी ही भारतातील, विशेषतः उत्तर भारत आणि पश्चिम बंगालमधील एक अत्यंत प्रसिद्ध आणि चवदार स्ट्रीट फूड रेसिपी आहे. हिंगाचा मस्त घमघमाट, बाहेरून कुरकुरीत आवरण आणि आतून चमचमीत मसालेदार सारण... यामुळे ही कचोरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच आवडती बनते. हिंग कचोरी केवळ जिभेचे चोचले पुरवत नाही, तर त्यात वापरलेला हिंग पचनासाठी अत्यंत गुणकारी असतो!
साहित्य-
१. पारीसाठी:
मैदा किंवा गव्हाचे पीठ: २ वाट्या
मोहनसाठी तेल/तूप: ३ ते ४ मोठे चमचे
ओवा: १/२ चमचा
मीठ: चवीनुसार
पाणी: पीठ मळण्यासाठी
२. आतील सारणासाठी:
उडीद डाळ (भिजवलेली): १ वाटी (२ ते ३ तास भिजवून जाडसर वाटून घेतलेली)
हिंग: १/२ ते १ मोठा चमचा (हिंगाचा वास आणि चव मुख्य असल्यामुळे हिंग चांगल्या दर्जाचा वापरावा)
सूंठ पावडर (सुकलेले आले): १/२ चमचा
धणे पावडर व जिरे पावडर: प्रत्येकी १ चमचा
लाल तिखट व बडीशेप पावडर: प्रत्येकी १ चमचा
गरम मसाला व अमचूर पावडर: प्रत्येकी १/२ चमचा
मीठ व सेंधवा मीठ: चवीनुसार
तेल: १ ते २ चमचे (परतण्यासाठी)
कृती-
सर्वात आधी एका भांड्यात मैदा/गव्हाचे पीठ घ्या. त्यात ओवा, मीठ आणि गरम तेलाचे मोहन टाका. सर्व नीट मिक्स करा (पिठाचा मुठा बनला पाहिजे). आता थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. पीठ १५-२० मिनिटे ओल्या कपड्याने झाकून ठेवा. आता कढईत २ चमचे तेल गरम करा. त्यात भरपूर हिंग आणि बडीशेप पावडर टाका. आता यात जाडसर वाटलेली उडीद डाळ घाला आणि मध्यम आचेवर २-३ मिनिटे परतून घ्या. त्यानंतर धणे पावडर, जिरे पावडर, लाल तिखट, सूंठ पावडर, अमचूर पावडर आणि मीठ घाला. सर्व मसाले डाळीत व्यवस्थित मिक्स होऊन डाळ कोरडी होईपर्यंत छान परतून घ्या. सारण थंड होऊ द्या. मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करा. गोळा हातावर पसरवून किंवा वाटीसारखा आकार देऊन त्यात १ ते २ चमचे हिंग-डाळीचे सारण भरा. कडा व्यवस्थित एकत्र आणून बंद करा, जेणेकरून कचोरी तेलात सुटणार नाही. हाताने हलके दाबून चपटा आकार द्या.
कढईत तेल मंद आचेवर गरम करा. कचोऱ्या तेलात सोडा. तसेच कचोरी नेहमी मंद आचेवरच तळावी, तरच ती आतून व्यवस्थित शिजते आणि बाहेरून मस्त कुरकुरीत होते. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. गरमागरम हिंग कचोरी तुम्ही बटाट्याची रस्सा भाजी, चिंचेची गोड-आंबट चटणी किंवा ओल्या मिरचीसोबत सर्व्ह करू शकता. तसेच पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात चहाच्या वेळेसही कचोरी खाण्याची मजा काही वेगळीच असते!
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
