बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. महिला दिन
Written By वेबदुनिया|

स्त्रीच्या आरोग्याची हत्या टाळा

ND
कन्या भ्रूण हत्या हा भारतीय समाजासाठी फार मोठा कलंक आहे. कायद्याने यावर बंदी आणली आहे. त्याच्या निषेधासंबंधी सामाजिक जागृती आणण्याची चर्चा समाजात होत आहे. पण फक्त चर्चा करूनच काही साध्य होणार नाही तर त्यासंबंधी काही पाऊल उचलणे गरजेचे आहे. या चर्चेत एक बाब महत्त्वाची आहे, ती म्हणजे गर्भपात करणार्‍या महिलेच्या शारीरिक आरोग्याच्या हत्येची. या गोष्टीकडे लक्ष देणारा विरळाच असेल कारण लोक गर्भपाताला एक खेळच समजतात. काहीजण तर कुटुंब नियोजनातील एक सोपा (?) उपाय म्हणजे गर्भपात समजतात.

आपल्या पत्नीच्या शारीरिक आरोग्याकडे आणि दु:खाकडे दुर्लक्ष करणारा पुरूष इतर तर्‍हेने कुटुंब नियोजन करण्याची जबाबदारी घेऊ इच्छित नाही. 'यात काय मोठेसे?' असे तो सहजपणे बोलतो. पण सहजपणे आणि सोप्या पद्धतीने होणारी ही प्रक्रिया चालता-बोलता करता येण्यासारखी नसते.

स्त्रीच्या शरीरात बाळ विकसित होण्याची प्रक्रिया जितकी जादुई आहे तितकीच गुंतागुंतीची आहे. हे फारच नाजूक हार्मोन्सवर अवलंबून आहे. गर्भपात करून सर्वकाही पूर्ववत होते हे मानणेच मुळी चुकीचे आहे. गर्भपातानंतर स्त्रियांचे हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि मानसिक स्वास्थही. काही स्त्रियातर अपराधाच्या भावनेने ग्रस्त होतात.

गर्भपात पुन्हा-पुन्हा केला गेला, म्हणजे मुलगा होईपर्यंत स्त्री-भ्रुण हत्या, कुटुंब नियोजनाचा सोपा (?) मार्ग हा स्त्रीच्या आरोग्यासंदर्भात केला जाणारा भयंकर खेळ आहे.

गर्भपाताला कायद्याची मान्यता नव्हती, तेव्हा नको असलेल्या अर्भकापासून मुक्तीसाठी तर वैदूंचा सहारा घेतला गेला. अशास्त्रीयपणे केले जाणारे हे गर्भपात स्त्रियांच्या जीवावरच बेतायचे. गर्भपाताला कायद्याने मान्यता दिल्यामुळे स्त्रियांना त्यातून तर सुटका मिळाली. त्यामुळे याला कायद्याची मान्यता असणे जरूरी आहे. मात्र तिच्या आरोग्यावर याचा प्रतिकूल परिणाम होतो हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे वारंवार गर्भपात करविणे योग्य नाही.

आपल्या देशात तर स्त्रियांच्या आरोग्याकडे इतके दुर्लक्ष केले जाते की बर्‍याच स्त्रिया उरलेल्या, शिळे अन्नावरच समाधान मानतात. फळ, दूध, सलाड, ताजे अन्न यावर तर पुरुषाचाच पहिला हक्क मानला जातो. 'मी काय मिळेल ते खाऊन जगेल' अशा वाक्यांवर महानतेचे 'टॅग' लावण्यात येते. अशा वातावरणात गर्भपाताला एक खेळ समजणे यात आश्चर्य काय?