मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. महिला दिन
Written By वेबदुनिया|

महिलांच्या सन्मानाची परंपरा कायम ठेवावी

मुख्यमंत्र्यांचे आवाहन

महिलांच्या सन्मानाची परंपरा कायम ठेवावी, असे आवाहन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दिलेल्या संदेशात केले आहे.

मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, दरवर्षी 8 मार्चला जगभर आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. केवळ स्त्री म्हणून वाट्याला येणाऱ्या मानवी हक्कांच्या पायमल्लीविरुद्घ रस्त्यावर उतरून केलेल्या संघर्षाची आठवण करून देणारा हा उत्सव आहे. आज जीवनाच्या सर्व क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तबगारीने बाजी मारली आहे, उद्योग-व्यवसायात आपल्या कर्तृत्वावर सर्वोच्च पदे मिळविली आहेत. असे असले तरीही शिक्षण, आरोग्य, रोजगार, वेतन, कामाचे तास या सर्वच बाबतीत महिलांना भेदभावाला सामोरे जावे लागते ही चिंतेची बाब आहे. महाराष्ट्राला झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले अशा कर्तृत्ववान आणि लढाऊ बाण्याच्या स्त्रियांची परंपरा लाभली आहे. आज देशाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झालेल्या श्रीमती प्रतिभाताई पाटील ह्या महाराष्ट्रकन्या आहेत, ही गौरवाची बाब आहे.

महिला धोरण जाहीर करून ते राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने राज्य शासन जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहे. महिला दिन हा एक दिवस साजरा करण्याचा उपचार राहू नये तर महिलांचा सन्मान करणे ही आपली परंपरा आहे आणि या परंपरेचा पुनरुच्चार आपण आज यानिमित्ताने करूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात केले आहे.