1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. जागतिक महिला दिन
Written By
Last Updated : बुधवार, 8 मार्च 2023 (09:46 IST)

भारतातल्या शहरातील अर्ध्याअधिक महिला घराबाहेर पडत नाहीत-संशोधन

सौतिक बिस्वास
19 वर्षांची मनिषा ही राष्ट्रीय राजधानी दिल्लीतल्या एका घरात पूर्णवेळ मोलकरीण म्हणून काम करते.
 
ती मूळची झारखंडची. पण, अनियमित सार्वजनिक वाहतूक आणि रस्त्यावर होणारं लैंगिक गैरवर्तन यामुळे तिनं शाळा सोडली. ती दिल्लीत आली आणि तिला एका अपार्टमेंटमध्ये नोकरी मिळाली. असं असलं तरी आजही ती बाहेर कुठे जात नाही, कारण तिला रस्त्यावर सुरक्षेचा अभाव जाणवतो.
 
"मी काम करत आहे. पण मी महिन्यातून एकदा किंवा दोनदाच बाहेर जाते. मला रस्त्यावर तितकसं सहज वाटत नाही," मनिषा सांगते.
 
दिल्लीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मध्ये वाहतूक संशोधन विषयाचे सहाय्यक प्राध्यापक राहुल गोयल यांना मनिषाची कहाणी आश्चर्यकारक वाटत नाही.
 
स्त्री-पुरुष गुणोत्तराचा दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी गोयल यांनी भारतातील पहिल्या Time Use Survey या सर्वेक्षणातील डेटा वापरला आहे.
 
ज्यात लोक वेगवेगळी कामं करण्यात किती वेळ घालवतात याचं मोजमाप करण्यात आलं आहे. (लोकांनी त्यांचा वेळ कसा वापरला याची माहिती गोळा करत 2019 मध्ये भारतभर सर्वेक्षक फिरले होते.)
 
या सर्वेक्षणात 1 लाख 70 हजार लोकांच्या दैनंदिन व्यवहाराचा अभ्यास करण्यात आला.
 
या सर्वेक्षणातील निष्कर्ष धक्कादायक होते. सर्वेक्षणकर्त्यांनी घरांना भेट दिली तेव्हा अर्ध्याहून अधिक म्हणजे 53% महिलांनी सांगितलं की त्यांनी आदल्या दिवशी घराबाहेर पाऊल ठेवलेलं नाही. तर केवळ 14% पुरुषांनी सांगितलं की तेसुद्धा घरातच थांबले होते.
 
मुली त्यांच्या पौगंडावस्थेमध्ये, 10 ते 19 या वयोगटात असताना मुलांपेक्षा बाहेर जाण्याची शक्यता कमी असते, असंही या अभ्यासात आढळून आलं.
 
महिला मध्यम वयात आल्यावर तिच्या गतिशीलतेत थोडीशी वाढ होते. पुराणमतवादी सामाजिक रुढी, परंपरा स्त्रियांना बालपणापासूनच घराबाहेर पडण्यास किंवा मोठेपणी काम करण्यास निर्बंध घालतात, असं गोयल यांना वाटतं.
 
या अभ्यासातून लिंग आधारित कामांमध्ये स्पष्ट विरोधाभास दिसून आला. स्त्रिया मोठ्या प्रमाणावर बिनपगारी घरकाम करतात, तर पुरुष घराबाहेरील कामांमध्ये वेळ घालवतात. 25 ते 44 वयोगटातील स्त्रिया दररोज सरासरी साडेआठ तास घरगुती कामात घालवतात. याच वयोगटातील पुरुष या कामांवर एक तासापेक्षा कमी वेळ घालवतात. 88% पुरुषांच्या तुलनेत या वयोगटातील केवळ 38% महिलांनी घराबाहेर गेल्याचं सांगितलं.
 
विवाहित असणं किंवा लिव्ह इनमध्ये राहणं, यामुळे स्त्रियांची गतिशीलता कमी झाल्याचं दिसून आलं, तर यामुळे पुरुषांची गतिशीलता वाढल्याचं समोर आलं.
 
तसंच विवाहित स्त्रिया किंवा बाळ असलेल्या महिला या कमी प्रमाणात घराबाहेर पडल्या. लग्न झाले असले तरी पुरुषांच्या गतिशीलतेवर अक्षरशः कोणताही परिणाम न झाल्याचंही दिसून आलं.
 
गोयल सांगतात की, "घरातील कामांची जबाबदारी महिलांवर असमानतेनं पडते असं निष्कर्षांमधून दिसून येतं."
 
कामाचं वय गाठल्यानंतर, स्त्रियांपेक्षा पुरुष जास्त प्रमाणात बाहेर पडत होते आणि काम करणाऱ्या लोकांच्या गटात सामील होत होते.
 
वय वर्षं 15 पर्यंत पोहोचल्यानंतर पुरुष शिक्षणातून कामाकडे वळतात, तर स्त्रियांच्या बाबतीत हा बदल कमी प्रमाणात घडतो.
 
काम करणाऱ्या किंवा शिकणाऱ्या 81% महिलांच्या तुलनेत काम न करणाऱ्या 30% महिला निदान एकदा तरी घराबाहेर पडल्या आहेत.
 
"काही स्त्रिया कामासाठी बाहेर पडत नाहीत असा याचा अर्थ नाही, तर अनेक महिला घराबाहेरच पडत नाहीत, असा याचा अर्थ आहे, " गोयल सांगतात.
 
अशोका विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका अश्विनी देशपांडे सांगतात की, "भारतात शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या मुलींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि त्या वर्गात उपस्थित नसल्याचे फारसे पुरावेही नाहीत. याचा अर्थ स्त्रिया अधिक प्रमाणात गतिशील झाल्या होत्या, तसंच सामाजिक धारणांमुळे मागेही हटल्या नव्हत्या."
 
"भारतीय महिलांना नक्कीच साखळदंडानं बांधलं जात नाही आणि त्यांना घरीही बसवलं जात नाही," असंही त्या पुढे सांगतात.
 
देशपांडे यांच्या मते, प्रवास करणं याचा प्रत्येक भाषेत अर्थ वेगळा प्रतित होत असावा. "माझ्या मते शाळा किंवा कॉलेजला जाणं म्हणजे घराबाहेर जाणं होत नाही," असं त्या सांगतात.
 
स्त्रियांची गतिशीलता कमी असणं हे केवळ सामाजिक रुढी किंवा नोकऱ्यांच्या अभावानं होतं असं नाही, असंही अनेकांचं मत आहे. उदाहरणार्थ, पुण्यासारख्या शहरात स्त्रिया सगळीकडे दिसतात, पण वर्कफोर्समध्ये महिलांच्या सहभागाचं प्रमाण कमी असल्याची देखील नोंद तिथं होते.
 
अर्थात, यात प्रादेशिक भिन्नता आहेत, असं गोयल यांचं मत आहे.
 
अनेक राज्यांमध्ये अनेक महिला नियमितपणे बाहेर पडतात. उदाहरणार्थ, गोवा हे एकमेव असं राज्य आहे जे गतिशीलतेच्या बाबतीत पूर्णपणे लिंग समान आहे, असं सर्वेक्षण सांगतं.
 
तामिळनाडूमध्ये स्त्रिया घराबाहेर पडताना अधिक प्रमाणात दिसतात. इथं भारतातील 1.6 दशलक्ष महिलांपैकी 43% महिला काम करतात, असं एका अभ्यासानुसार दिसून आलं आहे.
 
सरकारी योजनेत मोफत सायकल दिल्यानंतर बिहार आणि पश्‍चिम बंगालसारख्या राज्यातून अनेक मुली घराबाहेर पडत आहेत.
 
तरीही भारत आणि काही दक्षिण आशियामध्ये यात पिछाडी दिसते.
 
2007 च्या 15 युरोपीय देशांमधील time-use surveyच्या सारांशात असं आढळून आलं की, लिथुआनिया वगळता सर्व देशांमध्ये स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक गतिशील आहेत.
 
लंडनमध्ये प्रति व्यक्ती घराबाहेर पडण्याच्या संख्येत लिंग आधारित फरक आढळला नाही. फ्रान्समध्ये तर पुरुषांपेक्षा महिलांनी जास्त प्रवास केला.
 
ऑस्ट्रेलिया, युरोप, लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेतील जगभरातील 18 शहरांच्या आणखी एका अभ्यासात आढळून आलं की, 79% पुरुषांच्या तुलनेत सरासरी 76% महिलांनी बाहेर पडण्याची नोंद केली. यावरून असं दिसतं की, "भारतातील गतिशीलता दरात जी लिंग आधारित विषमता आहे, ती इतरत्र तशी पाळली जात नाही."
 
या संशोधनाचे एका पातळीवरील निष्कर्ष आश्चर्यकारक आहेत.
 
भारतात लैंगिक असमानतेचा दर उच्च आहे. लिंग गुणोत्तर कमी आहे. महिलांचा श्रमशक्तीतीलं सहभाग जगातील सर्वात कमी (27%) आहे आणि सामाजिक परंपरा त्यांच्या गतिशीलतेला निर्बंध घालतात.
 
त्यामुळे बर्‍याच स्त्रिया खूप कमी मैत्रिणींसोबत वेगळं राहणं सुरू ठेवतात, त्यांच्या संधी मर्यादित ठेवतात आणि असमानतेवर टीका करतात.
 
त्याचवेळी, देशात माता मृत्यू दर कमी झाला आहे, प्रजनन पातळी घसरली आहे, जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर हळूहळू सुधारत आहे आणि मुलींची शाळा आणि महाविद्यालयीन नोंदणी दर वाढला आहे.
 
गोयल सांगतात की, "महिलांना रस्त्यांवर असुरक्षित वाटतं. ही बाब लहान मुलं आणि वृद्धांसाठी देखील अनुकूल नाहीत. आपल्या सार्वजनिक जागा खूप मर्दानी आहेत, पुरुषांनी भरलेल्या आहेत. आपण त्याचं स्त्रीकरण करणं आवश्यक आहे."
 
याबद्दल थोडा वाद नक्कीच आहे.
Published By -Smita Joshi