शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. मातृ दिन
Written By
Last Modified: मंगळवार, 25 एप्रिल 2023 (12:52 IST)

आई हवीच, सखे आई हवीच

ऊन ऊन मऊ भाताचे चार घास,
काऊचिऊच्या गोष्टी सांगत भरवायला,
आई हवीच..
 
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर,
यशापयशात नी सुखदुःखातही,
आई हवीच..
 
वाढदिवसाच्या वा निकालाच्या दिवशी,
आवडीचे गोडधोड करून आपली वाट पाहणारी,
आई हवीच..
 
कौतुकासोबतच शिस्त लागावी म्हणून,
आठवणीने पाठीत चार रट्टे देणारी,
आई हवीच..
 
ऐन सोळाव्या वर्षातलं गोड गुलाबी गुपित,
हळूच कानात सांगायला,
आई हवीच..
 
मुलीच्या लग्नकार्याची काळजी आत दाबून,
हसत सर्वाला सामोरी जाणारी,
आई हवीच..
 
लग्नाच्या आदल्या रात्री,
कुशीत शिरून मनसोक्त रडायला,
आई हवीच..
 
लग्नानंतरचा सासरी आलेला राग,
हक्काने कोणावर तरी काढायला,
आई हवीच..
 
नवर्‍याशी झालेल्या कडाक्याच्या भांडणानंतर,
'आपणंच जरा समजुतीने घ्यावं गं' हे सांगायला,
आई हवीच..
 
पहिल्यावहिल्या बाळंतपणाची,
हौस पुरवायला व धीर द्यायला,
आई हवीच..
 
आईपण निभावता निभावता थकल्यावर,
विसाव्याचे हक्काचे ठिकाण अशी,
आई हवीच..
 
ऐन पन्नाशीत 'आता थकले बाई' असं म्हणताच,
ऐशी वर्षाची मी अजुन ठणठणीत आहे,
तुला काय धाडं भरल्ये असं म्हणायला,
आई हवीच..
 
वडील सासुसासरे नणंद नवरा नातेवाईक व मित्रमैत्रिणी,
कितीही प्रेमळ असले तरी आईची जागा भरून काढायला,
आई हवीच..
 
थोडक्यात काय..
आयुष्यात वेगवेगळ्या भूमिकांतून जाताना,
मुलीच्या पाठी खंबीरपणे उभी,
अशी तिची आई हवीच..
 
आई हवीच गं सखे,
आई हवीच..
 
- साभार सोशल मीडिया