खासगी रुग्णालयांत २४ तास लसीकरण सेवा सुरू
मुंबईमध्ये १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र, पालिका व सरकारी रुग्णालयात लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद लाभला नव्हता. त्यामुळेच केंद्र व राज्य सरकारच्या परवानगीने मुंबईतील जास्तीत जास्त खासगी रुग्णालयात कोरोनावरील लस देण्यात येत आहे. आतापर्यंत ३ लाख ९० लोकांना लस देण्यात आली आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आणि दररोज किमान एक लाख लोकांना लस देण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी आता खासगी रुग्णालयांत २४ तास लसीकरण सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे.
मुंबईत कोरोनावरील लसीकरण वाढवण्यासाठी महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या आढावा व नियोजन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनीही आरोग्य खात्याचे ज्येष्ठ अधिकारी, मनपा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर मंडळी, विविध खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी आदींना मार्गदर्शन केले. मुंबईत सध्या ६० वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यात येत आहे. ९ मार्चपर्यंत १ लाख ३६ हजार ४९१ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच ४५ ते ५९ या वयोगटातील १५ हजार २७२ व्यक्तींना लसीकरण झाले आहे.
२४ तास लसीकरण केंद्रे सुरु झाल्यानंतर दररोज १ लाख व्यक्तींचे लसीकरण करण्याचे लक्ष्य असल्याचा मानस आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला. मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांची संख्या ३० लाख असून दिवसाला १ लाख व्यक्तींचे लसीकरण झाल्यास एका महिन्यात ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल, असा आत्मविश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.