मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 53 रेल्वे स्थानकांवर 358 मदत कक्ष सुरु
मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना येत्या 15 ऑगस्टपासून उपनगरीय रेल्वे प्रवास करण्यास मुभा देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यानुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 53 रेल्वे स्थानकांवर 358 मदत कक्ष सुरु करण्यात आले आहेत.
ज्या नागरिकांना कोविड लशीचे दोन डोस घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झाले आहेत, त्यांचे लसीकरण अंतिम प्रमाणपत्र आणि छायाचित्र असणारं ओळखपत्र पडताळण्यात येत आहे. या ऑफलाईन पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्यांना रेल्वेकडून मासिक पास दिला जात असून त्याआधारे उपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
पहिल्या सत्रात रेल्वे प्रशासनाद्वारे 17 हजार 758 मासिक पासचं वितरण करण्यात आलं आहे. यामध्ये मध्य रेल्वेद्वारे 12 हजार 771, तर पश्चिम रेल्वेद्वारे देण्यात आलेल्या 4 हजार 987 मासिक पासचा समावेश आहे.
आज सकाळी 7 वाजल्यापासून मुंबईतील 53 रेल्वे स्थानकांवर ही प्रक्रिया सुरु झाली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी रेल्वे स्थानकावरील मदत कक्षाला भेट घेत रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला. ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया पार पाडताना येणारे रेल्वे प्रवासी आणि मदत कक्षावरील कार्यरत कर्मचारी यांनी देखील कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही, या दृष्टीने काळजी घेण्याचा सल्ला देखील महापौरांनी दिला.
दररोज सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत सलग 2 सत्रामध्ये मदत कक्ष कार्यरत असणार आहेत. यामुळे विनाकारण गर्दी न करता नागरिकांनी आपल्या घराजवळील रेल्वे स्थानकांवर पडताळणीकरिता जावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे