धारावीत ५२ हजारांहून अधिक विलगीकरणात
धारावीत करोनाबाधितांच्या संख्या वाढत असल्यामुळे काळजी वाढत आहे. यात नव्या १६ रुग्णांची भर पडून रुग्णांची संख्या ११७ वर पोहोचली आहे. यासाठी आता येथील ५२ हजारा लोकांना घरात बंदीस्त करावं लागत आहे.
करोनाचा संसर्ग वाढू नये याची खबरदारी म्हणून धारावीतील ३४ प्रतिबंधित विभागांमधील तब्बल ५२ हजारांहून अधिक व्यक्तींना घरात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
धारावीत १६ नवीन रुग्ण आढळले असून येथे आतापर्यंत करोनामुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाचे रुग्ण आढळलेल्या धारावीतील इमारती आणि परिसर असे मिळून ३४ ठिकाणे प्रतिबंधित करण्यात आले आहेत. येथे तब्बल ५२ हजार ८०० नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास मनाई करण्यत आली आहे. पालिकेने धारावीमधील घरोघरी नागरिकांची तपासणी करण्यासाठी नेमणूक केलेल्या पथकांनी आतापर्यंत ४० हजार नागरिकांची तपासणी केली असून २२३ नागरिकांच्या चाचण्या करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
येथील लोकं घराबाहेर पडू नये म्हणून या परिसरातील नागरिकांना दररोज सकाळी आणि रात्री प्रत्येकी जेवणाच्या पाकिटांचे वितरण, विविध धान्य आणि आवश्यक वस्तूंचा समावेश असलेल्या पाकिटांचे वाटप तसेच गरजवंतांना औषधांचाही पुरवठा करण्यात येत आहे.