गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (23:31 IST)

मुंबईत 'या' दिवशी कोरोना लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यासाठी विशेष सत्राचे आयोजन

मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोरोना लसीकरण केंद्रावर, शनिवारी म्हणजे 4 सप्टेंबर 2021ला कोविड-19 लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्‍यांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आलं आहे. त्यामुळे या दिवशी कोविड लसीचा पहिला डोस कोणालाही दिला जाणार नाही.
 
मुंबईसह भारतात कोविड-19 विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी कोविड-19 लस उपलब्ध झाली आहे. या अनुषंगाने राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण कार्यक्रम अंतर्गत दिनांक 16 जानेवारी 2021 पासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लसीकरण टप्प्याटप्प्याने सुरु आहे. या लसीकरण कार्यक्रमामध्‍ये आजपर्यंत 69 लाख 26 हजार 255 लाभार्थ्‍यांना पहिली मात्रा (डोस) तर 25 लाख 17 हजार 613 लाभार्थ्‍यांना दुसरी मात्रा देण्‍यात आलेली आहे. या आकडेवारीवरुन असं निदर्शनास येतं की, पहिल्या मात्रेच्या तुलनेत दुसरी मात्रा घेणाऱ्या लाभार्थ्‍यांचं प्रमाण कमी आहे.
 
सद्यस्थितीत, कोविड-19 या आजाराची रुग्‍णसंख्‍या काहीशी वाढत आहे. तसंच, कोविडची तिसरी लाट येण्‍याची शक्‍यता वैद्यकीय तज्ञांनी वर्तवली आहे.‍ या सर्व पार्श्वभूमीवर, कोविड-19 लसीचा दुसरा डोस (कोविशिल्‍ड असल्यास पहिल्या डोस नंतर 84 दिवस आणि कोव्‍हॅक्‍सीन असल्यास पहिल्या डोस नंतर 28 दिवस पूर्ण झाल्‍यास) घेऊन नागरिकांचे लसीकरण पूर्ण होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्‍यांसाठी विशेष सत्र आयोजित केलं आहे.