ठाणे, दादरला मनसेचा ‘गनिमी’ कावा करीत मध्यरात्रीच फोडली दहीहंडी
कोरोनामुळे यंदा दहीहंडी साजरी करता येणार नाही. शासनाने दहीहंडीला मनाई केली आहे. मात्र, त्याला मनसेने विरोध करत ठाणे, दादरला गमिनी कावा करीत मध्यरात्रीच मानवी मनोरे लावून दहीहंडी फोडली.ठाण्यातील वर्तकनगर येथील लक्ष्मी पार्क चौकात मनसेचे जिल्हा प्रमुख संदीप पाचंगे आणि मनसे सैनिकांनी मानवी मनोरे लावून दहीहंडी फोडली.मुंबई व ठाण्यात अनेक ठिकाणी मनसेने कुठे तीन थरांची तर कुठे चार तर कुठे पाच थर लावून दहीहंडी (MNS Dahi Handi) फोडत सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
ठाण्यातील नौपाडा येथील मनसेच्या मुख्य कार्यालयात देखील मनसे सैनिकांनी दहीहंडी फोडली. वर्तकनगर येथील लक्ष्मी पार्क चौकात दहीहंडी फोडताना मनसेचा झेंडा हातात घेऊन सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. मुंबई, ठाण्यामध्ये मध्यरात्रीनंतर दहीहंडी उभारुन सकाळनंतर दहीहंडी उत्सव सुरु होतो. ठाण्यातील नौपाडा येथील भगवती मैदानात दहीहंडी साजरी करणारच असा इशारा सोमवारी दिला होता.पोलिसांनी मैदानात उभारण्यात येत असलेला मंडप काढायला सांगितला होता. यावेळी मनसे नेते आणि पोलीस यांच्यात काही वेळ वादावादी झाली होती.पोलिसांनी मनाई केली असतानाही मध्यरात्री १२ वाजता मनसेने अचानक दहीहंडी उभारुन ती मानवी मनोरे उभारुन दहीहंडी फोडली.त्यानंतर पोलिसांनी काही मनसे सैनिकांना पोलिसांनी अटक केली.त्यानंतर त्यांना पहाटे जामिनावर सोडण्यात आले.दहीहंडी सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई करण्यात आली असल्याने मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्यभर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.