गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 22 जून 2021 (07:53 IST)

ठाण्यात सुसज्ज असे कर्करोग हॉस्पिटल सुरू करण्याचा प्रयत्न

ठाणे व परिसरातील नागरिकांना कर्करोगावर दर्जेदार आणि किफायतशीर उपचार मिळावेत, यासाठी ठाण्यात सुसज्ज असे कर्करोग हॉस्पिटल सुरू करण्याच्या पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे महापालिकेच्या प्रयत्नांना यश आले. ठाणे महापालिका, टाटा मेमोरिअल सेंटर आणि जितो एज्युकेशनल व मेडिकल ट्रस्ट यांच्या माध्यमातून साकारणाऱ्या या प्रकल्पासाठी नाममात्र दराने भूखंड देण्यास नगरविकास विभागाने मंजुरी दिली असून त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच ठाणे महापालिका, टाटा मेमोरिअल सेंटर आणि जितो एज्युकेशनल व मेडिकल ट्रस्ट यांच्यातील त्रिपक्षीय सामंजस्य करारावर अंतिम मोहोर उमटवण्यात येणार आहे.
कर्करुग्णांचे वाढते प्रमाण, महागडे उपचार आणि मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयावर येणारा ताण या बाबी लक्षात घेऊन ठाण्यात अत्याधुनिक उपचारांची सोय असलेले सुसज्ज असे कॅन्सर हॉस्पिटल असावे, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील होते. त्यांच्या सूचनेवरून ठाणे महापालिकेने टाटा मेमोरिअल सेंटर समवेत अशा प्रकारचे रुग्णालय उभारण्याबाबत चर्चा केली. टाटा मेमोरिअल सेंटरने याबाबत स्वारस्य दाखवले. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने याबाबतचा ठराव करून माजीवडे येथील रुस्तमजी गृहसंकुलातील सुविधा भूखंडाअंतर्गत प्राप्त झालेला भूखंड या प्रकल्पासाठी देण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेने या प्रस्तावाला मंजुरी देण्याची विनंती नगरविकास विभागाला केली होती.
 
नगरविकास विभागाने सदरचा भूखंड ३० वर्षांच्या कालावधीसाठी १ रुपया नाममात्र दराने देण्यास ठाणे महापालिकेला मंजुरी दिली आहे. ठाणे महापालिका, टाटा मेमोरिअल सेंटर आणि जितो एज्युकेशनल आणि मेडिकल ट्रस्ट संयुक्तरित्या या रुग्णालयाची उभारणी करणार आहेत. टाटा मेमोरिअल सेंटरसारख्या, देशातील सर्वोत्तम कॅन्सर रुग्णालय चालवण्याचा अनुभव असलेल्या रुग्णालयाच्या माध्यमातून या नव्या रुग्णालयाचे परिचालन होणार असल्यामुळे नागरिकांना दर्जेदार व अद्ययावत उपचार किफायतशीर दरात उपलब्ध होतील, असा विश्वास नगरविकास मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.