सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 5 जून 2021 (22:53 IST)

‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य... त्यांचा पराक्रम... त्यांनी घालून दिलेला राज्यकारभाराचा आदर्श अद्वितीय असून त्यांचे जीवन, कार्य, विचार महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत मार्गदर्शन करीत राहिल अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन शिवराज्याभिषेक दिनानिमित्त त्यांना त्रिवार वंदन केले आणि राज्यातील जनतेला शिवराज्याभिषेक दिनाच्या, शिवस्वराज्य दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
 
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचे राज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केले . ‘प्रजा सुखी तरच राजा सुखी’ या न्यायाने राज्यकारभार केला. महान योद्धा, कुशल प्रशासक, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष राजा ही स्वत:ची ओळख निर्माण केली. महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान जागृत केला. ते राजनीती, युद्धनीती, अर्थनीती, संघटनकौशल्याचा सखोल अभ्यास असलेले, मानवी मुल्यांवर निष्ठा असलेले दूरदृष्टीचे राजे होते. 
 
 
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत. त्यांच्यासारखा महामानव हजारो वर्षात एकदाच जन्म घेतो. अखिल मानवजातीचे कल्याण करुन जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात केलेले कार्य अलौकिक आहे. महाराजांनी दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांना, अठरापगड जातींना एकत्र करुन त्यांच्या मनात, स्वाभिमानाचे, स्वराज्याचे बीज रुजवले. प्रत्येकाला आपले वाटेल, सर्वांना न्याय मिळेल असे शिवस्वराज्य निर्माण केले. शेतकऱ्यांना न्याय दिला. कष्टकऱ्यांना स्वाभिमान दिला. शिवराज्याभिषेकाने महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा लोककल्याणकारी राजा दिला. त्यांच्यासारखा राजा जगाला पाहता आला म्हणूनच शिवराज्याभिषेक दिनाचे महत्व आपल्या सर्वांच्या जीवनात सर्वाधिक आहे असेही अजित पवार म्हणाले. 
 
 
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शेतकऱ्यांचे कैवारी, रयतेचे राजे, युगप्रवर्तक राजे छत्रपती शिवाजी महाराजांना, शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने वंदन करत असताना त्यांच्या विचारांना आदर्श मानून, त्यांनी दाखवलेल्या वाटेवरुन चालण्याचा, महाराष्ट्राचा सन्मान वाढवण्याचा निर्धार करुया अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कृतज्ञता, आदर व्यक्त करीत राज्यातील जनतेला शिवराज्याभिषेक दिनाच्या, शिवस्वराज्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.