मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 जुलै 2024 (17:33 IST)

मृतदेहावरील टॅटूच्या मदतीनं पोलिसांनी आरोपीला कसं शोधलं?

murder
मुंबईतल्या वरळीत ‘सॉफ्ट टच स्पा’ सेंटरमध्ये 23 ते 24 जुलैच्या मध्यरात्री एका व्यक्तीची हत्या झाली. त्यानंतर वरळी पोलिसांनी त्या मृताच्या शरीरावर असलेल्या टॅटूवरून आरोपींचा शोध लावला तर स्पा सेंटरच्या मालकाने हत्येची सुपारी दिल्याचं समोर आलं.
पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. पण, या टॅटूवर असं काय लिहिलं होतं की वरळी पोलीस थेट आरोपींपर्यंत पोहोचले?
 
गुरुसिदप्पा वाघमारे असं मृताचं नाव आहे, तर फिरोज अन्सारी आणि शाकीब अन्सारी अशी हत्या करणाऱ्या आरोपींची नावे, तर संतोष शेरेकर असं सुपारी देणाऱ्या स्पा सेंटरच्या मालकाचं नाव आहे.
 
वाघमारे 23 जुलैला सायन इथल्या बारमध्ये आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत स्पा सेंटरमधले दोन कामगार देखील होते.
सर्वजण पार्टी आटोपून साडेबारा वाजण्याच्या सुमारास स्पा सेंटरमध्ये पोहोचले. यावेळी आरोपी फिरोज आणि शाकीब अन्सारी दोघांनीही वाघमारेचा पाठलाग केला.
 
वाघमारेच्या सोबत असलेले स्पा सेंटरचे दोन कामगार निघून गेल्यानंतर या दोघांनीही गुरुसिदप्पा वाघमारेची हत्या केली. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
 
त्यानतंर 24 जुलैला सकाळी वरळी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. वरळी पोलिसांनी स्पा सेंटरमध्ये तपास करून मृतदेह ताब्यात घेतला.
 
टॅटूमध्ये काय लिहिलं होतं?
आपल्या जीवाचं काहीतरी बरं-वाईट होऊ शकतं याची पूर्ण कल्पान वाघमारेला असावी. त्यामुळेच त्याने त्याच्या शरीरावर टॅटू गोंदवून घेतला होता.
 
शवविच्छेदनादरम्यान गुरुसिदप्पा वाघमारेच्या दोन्ही मांड्यांवर टॅटू काढलेले पोलिसांना दिसले. ‘’माझ्या दुश्मनांची नावे, डायरीत नोंद आहेत. चौकशी करून कारवाई करावी’’ असं दोन्ही मांड्यावर त्यानं गोंदवून घेतलेलं होतं.
तसेच एका मांडीवर 10 जणांचे तर एका मांडीवर 12 जणांचे नावं लिहिलेली होती. यामध्ये ज्या स्पा सेंटरमध्ये गुरुसिडप्पाची हत्या झाली त्या स्पा सेंटरचा मालक संतोष शेरेकरचं देखील नाव लिहिलं होतं. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीनं तपास केला.
 
या टॅटूवर लिहिलं होतं त्यानुसार पोलिसांनी वाघमारेच्या घराची तपासणी केली असता त्यांना काही डायरी देखील सापडल्या ज्यामध्ये हिरवा, निळ्या आणि लाल रंगांमध्ये अनेक तपशील लिहिलेले होते.
 
तसेच स्पा सेंटरमधून मिळालेल्या पैशांबद्दलही यात माहिती होती. त्यामुळे पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचणं आणखी सोपी झालं.
 
पोलिसांनी आरोपींना कसं पकडलं?
टॅटूमध्ये स्पा सेंटरचा मालक संतोष शेरेकरचं नाव होतंच. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरचे सीसीटीव्ही तपासले असता, यामध्ये फिरोज आणि शाकीब दोघेजण दिसले.
 
दोघेही हत्येनंतर दुचाकीनं कांदीवलीला गेले होते.
 
त्यानंतर फिरोज त्याच्या नालासोपारा इथल्या घरी गेला होता, तर शाकीबने दिल्लीसाठी ट्रेन पकडली होती. या दोघांनीही वाघमारेचा पाठलाग करताना सायन इथं तंबाखू विकत घेतला होता त्यावेळी ऑनलाईन पेमेंट केलं होतं. त्यामधून पोलिसांना या आरोपींचा नंबर मिळाला होता.
पोलिसांनी दोन्ही आरोपींचा शोध घेतला असता शाकीब ट्रेनमध्ये असल्याचं समजलं. पोलिसांनी रेल्वे पोलिसांना त्याचा फोटो पाठवून शाकीबला राजस्थानमधल्या कोटा येथून अटक केली, तर फिरोज अंसारीला नालासोपारा इथून अटक करण्यात आली.
 
स्पा मालकानं वाघमारेची हत्या का केली?
वाघमारे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातल्या स्पा मालकाकडून खंडणीची मागणी करायचा. वाघमारेनं वरळीतल्या सॉफ्ट टच या स्पा सेंटरचा मालक संतोष शेरेकरकडेही खंडणी मागितली होती.
 
वाघमारे हा शेरेकरला पैशांसाठी वारंवार त्रास द्यायचा. त्यामधून या दोघांमध्ये वाद होता. त्यामुळे वरळीतला स्पा सेंटरचा मालक संतोष शेरेकर वाघमारेच्या खंडणीच्या त्रासाला कंटाळला होता.
याच वादातून त्यानं वाघमारेच्या हत्येची सुपारी फिरोज अन्सारी आणि शाकीब अन्सारी दोघांना दिली होती. त्यानंतर या दोघांनीही स्पा सेंटरमध्ये घुसून वाघमारेची हत्या केल्याचं समोर आलं.
 
याप्रकरणात संतोष शेरेकर, फिरोज आणि शाकीब या तिघांना अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना दिली.
Published By- Priya Dixit