मुंबईच्या रेल्व स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीटात वाढ
मध्य रेल्वेनं मुंबई महानगर क्षेत्रातील काही महत्त्वाच्या रेल्व स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीटात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळ्यात कोरोनाचा धोका असल्यानं रेल्वे स्थानकावरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे. २४ फेब्रुवारी रोजी हा निर्णय घेण्यात आला असून, १५ जूनपर्यंत लागू असणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी याबाबत माहिती दिली आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, भिवंडी रोड स्टेशन या स्थानकांचं प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये करण्यात आलं आहे. पूर्वी या स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपये होते. या रेल्वे स्टेशनवर नेहमी गर्दी असते. उन्हाळ्यात प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता असल्यानं आणि कोविडचं संक्रमण अजूनही कमी झालेलं नाही. त्यामुळे गर्दी होणाऱ्या या स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीट वाढवण्यात आल्याचं सुतार यांनी सांगितलं.