येत्या 15 डिसेंबरपर्यंत लोकल प्रवास अशक्य
येत्या 15 डिसेंबरपर्यंत अर्थात तब्बल दीड महिना तरी सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास सुरू होणार नाही. पुढील तीन आठवडे कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आली तर 15 डिसेंबरनंतर सर्वांसाठी मुंबई लोकल सुरू करण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली.
देशातील सर्वाधिक बाधित रुग्ण असलेल्या राज्यातून लोक मोठ्या संख्येने मुंबईत आले तर मुंबईची स्थिती बिघडेल, त्यामुळे खबरदारी घेतली जात आहे. सध्या दिल्लीच्या तुलनेत मुंबई सेफ असली तरी रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी संपूर्णतः खबरदारी घेण्यात येत आहे. पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये यासाठी कडक पावले उचलली असून आजची स्थिती 15 डिसेंबरपर्यंत कायम राहिल्यास सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याबाबतचा निर्णय घेता येईल, असे चहल म्हणाले.