नवाब मलिकांच्या मुलाच्या कंपनीत गैरव्यवहार; ईडीची ५ ठिकाणी छापेमारी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयला एनसीबीने अटक केली होती. परंतु जावयाला न्यायालयाने दिलासा दिला आहे. परंतु आता नवाब मलिकांच्या मुलाच्या मागे ईडीचा ससेमीरा लागला आहे. सोमवारी मुबंईतील पाच ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. मलिकांच्या मुलाच्या कंपनीत गैरव्यवहार झाला असल्याचे समोर आले असल्यामुळे ईडीने कारवाई सुरु केली आहे. एका राष्ट्रीयकृत बँकेची १४९.८९ कोटी रुपये फसवणूकीप्रकरणी ईडी कारवाई करत आहे.
राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेतलेल्या रक्कमेतील काही रक्कम राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक याच्या संबंधित असलेल्या कंपनीकडे वळवण्यात आली होती. या रक्कमेतील १० टक्के फराज मलीक यांना मिळाले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. युनियन बँकेच्या कर्जातून गैरवापर केलेला निधी फराज मलिक यांच्याशी संबंधित कंपनीकडे वळवण्यात आला याचा जर यंत्रणेला पुरावा सापडला तर त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
सीबीआयने ९ जून २०२१ रोजी ८ जणांविरोधात एफआयआरची नोंद केली होती. तसेच या संदर्भात मुंबईतील युनियन बँक ऑफ इंडिया फोर्ट शाखेत तैनात उपमहाव्यवस्थापकाने तक्रार केली होती. या तक्रारीत असे म्हटलं आहे की, असोसिएट हाय प्रेशर टेक्नॉलॉजीला लिमिटेडच्या संचालकांनी, हमीदार आणि अज्ञात लोकांनी षडयंत्र रचून बँकेची फसवणूक केली असल्याचे म्हटलं आहे. यामुळे युनिय बँक ऑफ इंडियाचे एकूण १४९.८९ कोटी रुपये नुकसान झालं आहे.