शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (16:01 IST)

मराठी भाषा दिनासाठी मनसे आक्रमक, जी कारवाई करायची ती करा खोपकर यांचे आव्हान

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने अर्थात २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आता मनसे आक्रमक होत तसा इशाराच मनसे नेते अमेय खोपकर यांनी दिला आहे. ‘मराठी भाषा दिन पाळण्यासाठी देखील जर सरकार विरोध करणार असेल, तर धन्य आहे हे सरकार. उद्याचा कार्यक्रम होणारच, जी कारवाई करायची ती करा’, असं जाहीर आव्हानच अमेय खोपकर यांनी दिलं आहे. 
 
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने दरवर्षी मनसेकडून कार्यक्रम केले जातात. या वर्षी खुद्द राज ठाकरेंनी जाहीर पत्राद्वारे ‘मराठी स्वाक्षरी मोहिमे’चं आवाहन केलं होतं. मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरून राज ठाकरेंच्या सहीनिशी हे पत्र पोस्ट करण्यात आलं आह. यामध्ये ‘मराठी राजभाषेच्या निमित्ताने एक सुरुवात केली, तर आपण एक मोठा पल्ला गाठू तो म्हणजे आपण आपली स्वाक्षरी जी आपली ओळख असते, ती मराठीत सुरू करूया. त्याची सुरुवात करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्रातील शाखाशाखांत फलक लावलेले असतील, त्या ठिकाणी सहकुटुंब जाऊन मराठीत स्वाक्षरी करा आणि त्याच वेळेला आपली भाषा अधिक मोठी करण्याची प्रतिज्ञा करा’, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.
 
दरम्यान, शिवाजी पार्क येथे यासाठीचा कार्यक्रम करण्याची परवानगी मनसेकडून मागण्यात आली होती. मात्र, ही परवानगी नाकारण्यात आली आहे. “महापालिकेकडे आम्ही रीतसर परवानगी मागितली होती. सर्व नियम पाळून आम्ही कार्यक्रम करणार होतो. पण आम्हाला परवानगी नाकारली आहे. तरी आम्ही कार्यक्रम पार पाडणार आहोत. सरकारला हवी ती कारवाई माझ्यावर करावी. मी तयार आहे. पण सरकारमधल्या एका मंत्र्याला वेगळा न्याय, आणि नियम काटेकोरपणे पाळणाऱ्याला वेगळा न्याय असं हे चालू आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा दिन पाळायला जर हे सरकार विरोध करणार असेल, तर धन्य आहे हे सरकार”, अशी भूमिका अमेय खोपकर यांनी जाहीर केली आहे.