1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (08:03 IST)

मुंबई पूर्व सायबर विभागाचा ई-मेल आयडी अज्ञात हॅकरकडून हॅक

Mumbai East Cyber Department's e-mail ID hacked by unknown hackers Maharashtra News Mumbai News Webdunia Marathi
मुंबई पूर्व सायबर विभागाचा ई-मेल आयडी अज्ञात हॅकरकडून हॅक करण्यात आला आहे. हॅकरकडून ‘जे.के. हल्ल्या मागील दहशतवादी मुंबईत ठार’ या आशयाचा ई-मेल मुंबई पोलिसांच्या पूर्व सायबर विभागातून राज्यभरातील पोलीस ठाण्याच्या अधिकृत ई-मेल आयडीवर पाठवण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्य सायबर विभागाकडून हे प्रकरण गंभीरतेने घेतले असून या मेल सोबत येणारी फाईल उघडू नये, असे आवाहन राज्य सायबर सेलकडून राज्यभरातील पोलिसांना करण्यात आले आहे.
 
मुंबई पोलिसांकडून सायबर गुन्हे विभाग व्यतिरिक्त प्रत्येक प्रादेशिक विभागात सायबर विभाग सुरू करण्यात आला आहे. मुंबई पूर्व, पश्चिम, दक्षिण , उत्तर आणि मध्य असे पाच सायबर विभाग सुरू करण्यात आलेले आहेत. प्रत्येक सायबर विभागात त्या त्या प्रादेशिक विभागातील पोलीस ठाण्यातील सायबरचे गुन्हे दाखल होऊन तपास केला जात आहे. यापैकी पूर्व सायबर विभागाचा ई-मेल आयडी अज्ञात हॅकरकडून हॅक करण्यात आला आहे.
 
या हॅकरकडून पूर्व सायबर विभागाच्या अधिकृत मेल आयडीवरून राज्यातील सर्व पोलीस ठाणे, शासकीय विभाग आणि वरिष्ठ अधिकारी यांना फिशिंग मेल पाठवण्यात येत आहे. या ई मेल मध्ये इंग्रजीमध्ये terrorist behind jk attack gunned down in mumbai’ (‘जेके हल्ल्या मागील दहशतवादी मुंबईत ठार) या आशयाचा मेल आणि सोबत ‘रिपोर्ट इंटेलिजन्स’ नावाने ‘पीडीएफ’ फाईल पाठवली जात आहे.
 
ही फाईल उघडल्यानंतर संगणकातील डेटा चोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे प्रकरण ‘महाराष्ट्र सायबर विभागाने गंभीरतेने घेतले असून राज्यभरातील पोलीस ठाणे शासकीय विभागाला सतर्क करण्यात आलेले असून या आशयाचा ई-मेल उघडू नये तसेच त्यासोबत असलेली पीडीएफ डाऊनलोड करू नये, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांनी पत्रक पाठवून केले आहे.