मुंबईतला एकही आमदार मंत्री होऊ शकला नाही. ही मुंबईची शोकांतिका आहे
अखेर मंगळवारी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. मात्र, अपक्ष आणि मित्रपक्षांना सहभागी करून घेतलं नसल्यामुळे त्यावरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे. प्रहारसंघटनेचे बच्चू कडू यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारावर राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी नव्याने शपथ घेतलेल्या मंत्र्यांवर टीका केली आहे. विशेषत: शिवसेनेतून बाहेर पडून शिंद गटात दाखल झालेल्या आमदारांना त्यांनी लक्ष्य केलं आहे.
“मराठी मुंबईतून लोढांना मंत्रीपद”
मंगलप्रभात लोढा यांना मंत्रीपद दिल्यावरून किशोरी पेडणेकर यांनी टीका केली आहे. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मी अभिनंदन करते. मराठी मुंबईतून त्यांनी मंगलप्रभात लोढा यांना मंत्रीपद दिलं. अर्थात हा त्यांच्या पक्षाचा अजेंडा आहे. पण आमच्याकडून गेलेला आणि शिवसेना आमची आहे असं म्हणणारा मुंबईतला एकही आमदार मंत्री होऊ शकला नाही. ही मुंबईची शोकांतिका आहे”, असं किशोरी पेडणेकर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.