बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020 (16:04 IST)

ज्येष्ठ कलाकारांना शूटींगकरता येणार, कोर्टाचा दिलासा

मुंबई हायकोर्टाने ज्येष्ठ कलाकारांच्या फिरण्यावरील निर्बंध हटवले आहे. त्यामुळे आता टीव्ही मालिका आणि चित्रपटांच्या शूटींगकरता ज्येष्ठ कलाकार जाऊ शकणार आहेत. गेल्या महिन्यांपासून राज्यात टीव्ही तसेच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. मात्र राज्य सरकारच्या नियमावलीनुसार ६५ वर्षांवरील कलाकारांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयाला अनेक ज्येष्ठ कलाकारांनी नाराजी दर्शवली होती. रोहिणी हट्टगडी, दिलीप प्रभावळकर, उषा नाडकर्णी यांनी आम्हालाही शूटींगला जाण्याची परवानगी मिळायला हवी. आम्ही खबरदारीच्या सर्व उपाययोजना करू, असे म्हटले होते. त्यामुळे आता मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर या ज्येष्ठ कलाकारांना दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे. 
 
ज्येष्ठ कलाकारांना निर्बंध घालणारी सरकारची दोन्ही पत्रके बेकायदा ठरवून रद्द केली आहेत. ‘मिशन बिगीन अगेन’ सुरू करताना राज्य सरकारने लॉकडाउनमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय मे महिन्याच्या अखेरीस घेतला. त्यात टीव्ही मालिका तसेच चित्रपटाच्या चित्रिकरणासाठीही सशर्त परवानगी देण्यात आली. मात्र, ६५ किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या कलाकारांना चित्रिकरणात सहभागी होता येणार नसल्याचे परिपत्रकात स्पष्ट केले होते. त्यामुळे अनेक ज्येष्ठ कलाकार अडचणीत आले.