शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. मुंबई कुणाची?
Written By वेबदुनिया|

देशाची आर्थिक राजधानी

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. या महानगराची लोकसंख्या सव्वा कोटीच्या आसपास आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये मुंबई एक आहे. मुंबई महानगर म्हणून जो भाग ओळखला जातो, त्याची एकूण लोकसंख्या दीड ते पावणे दोन कोटीच्या आसपास आहे. त्यात नवी मुंबई आणि ठाणे या महागनर पालिकांचाही समावेश होतो.

जगातील दहा व्यावसायिक केंद्रांमध्ये मुंबईचा समावेश होतो, यावरून मुंबईचे जागतिक पातळीवरील महत्त्व लक्षात यावे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी जशी आहे, तशीच ती मनोरंजनाचीही राजधानी आहे. देशातील २५ टक्के व्यापार, बंदराच्या माध्यमातून होणारा ४० टक्के व्यापार आणि ७० टक्के भांडवली व्यवहार भारताच्या गंगाजळीत भर घालत असतात. मुंबईतच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया, मुंबई शेअर बाजार, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आहे. शिवाय अनेक बड्या कंपन्यांची मुख्यालये याच महानगरात आहे.

देशातील एकूण कारखानदारी नोकरदारांपैकी दहा टक्के लोक येथे रहातात. देशातील ४० टक्के आयकर आणि साठ टक्के कस्टम ड्यूटी येथून जमा होते. वीस टक्के केंद्रीय अबकारी कर येथूनच केंद्राच्या तिजोरीत भरला जातो. शिवाय देशाचा ४० टक्के परकीय व्यापार येथूनच चालतो. कॉर्पोरेट करापैकी चाळीस अब्ज रूपयांचा कर मुंबई देते.

मुंबईचे प्रती माणशी उत्पन्न ४८ हजार ९५४ आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय सरासरीच्या ते तिप्पट आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया, टाटा ग्रुप, गोदरेज, रिलायन्स यांच्यासारखी भारतातील बडी व्यावासायिक आस्थापनांचे मुंबईत मुख्यालय आहे. फोर्च्युन ग्लोबल ५०० कंपन्यांमधील चार कंपन्या मुंबईत आहेत. अनेक परकीय बॅंका आणि वित्तीय संस्थांनी मुंबईत शाखा उघडल्या आहेत. याशिवाय केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या संस्थाही येथे आहेत. ज्यात भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर, ऑईल अँड नॅचरल गॅस लि. (ओएनजीसी), बॉम्बे हाय याचा समावेश होतो. देशातील चौदा टक्के तेलाची गरज बॉम्बे हायमधून भागवली जाते.

देशातील सर्वांत मोठे विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) नवी मुंबईत उभारले जाणार आहे. पन्नास चौरस किलोमीटरमध्ये त्याचा विस्तार असेल. याशिवाय आणखी एक महामुंबई सेझही जवळच उभारले जाणार आहे. हे प्रत्यक्षात आल्यास मुंबईचा विस्तार किती मोठा असेल याचा विचारच केलेला बरा.

मनोरंजनाचे केंद्र येथेच असल्याने त्याला बॉलीवूड असेही म्हटले जाते. बॉलीवूड ही जगातील सर्वांत मोठी मनोरंजनाची इंडस्ट्री आहे. जगात सर्वाधिक चित्रपट बॉलीवूडमध्ये तयार होतात. त्याचबरोबर मराठी चित्रपटांचेही मुंबई हेच प्रमुख केंद्र आहे.