राज ठाकरे यांची आता अमिताभवर टीका
कारकिर्द महाराष्ट्रात, ह्रदयात मात्र उत्तर प्रदेश
महाराष्ट्रात राहून उत्तर प्रदेशशी निष्ठा जपणाऱ्यांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका सुरू केलेली असताना त्यांनी आता या वादात सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनाही ओढले आहे. महाराष्ट्रात राहून स्वतःची चित्रकारकिर्द घडविणारे अमिताभ हित मात्र उत्तर प्रदेशाचे जपतात, अशी टीका राज यांनी केली आहे. धारावी येथे शुक्रवारी रात्री झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. अमिताभ महाराष्ट्रात राहून सुपस्टार झाले असले तरी त्यांच्या ह्रदयात उत्तर प्रदेशविषयी जास्त निष्ठा आहे, असे सांगून राज म्हणाले, की उत्तर प्रदेशाशी निष्ठा असल्यामुळेच त्या राज्याच्या दूत असल्यासारखे ते वागत आहेत. सगळे काही मुंबईने दिले असताना अमिताभ यांनी निवडणूक लढविण्यासाठी मात्र उत्तर प्रदेशात धाव घेतली. महाराष्ट्रात उत्तर भारतीय दिवस आणि छट पूजा साजरी करण्यावर राज यांनी आक्षेप घेतला होता. या प्रकरणी धार्मिक भावना दुखावल्या म्हणून इतर राजकीय पक्षांकडून टीकाही झाली आहे.