आरुषी-हेमराज हत्याकांड: तलवार दाम्पत्याला जन्मठेप
देशभर गाजलेल्या आरुषी- हेमराज दुहेरी हत्याकांडप्रकरणी आरुषीचे आईवडील आणि दंतवैद्य डॉ.नुपूर व डॉ.राजेश तलवार यांना कोर्टाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सीबीआयने तलवार दाम्पत्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. विशेष सीबीआय कोर्टाने सोमवारी तलवार दाम्पत्याला पोटची मुलगी आरुषी आणि घरातील नोकर हेमराज यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले होते. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शिक्षेवर इन कॅमेरा सुनावणी घेण्यात आली. यापूर्वी मुख्य आरोपी डॉ. राजेश तलवार यांच्यावर कोर्ट परिसरात हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे ही खबरदारी घेण्यात आली होती.तलवार दाम्पत्याला जन्मठेपेसह पुरावे नष्ठ केल्याने (कलम 201) पाच वर्षांचा आणि पोलिसांत खोटी तक्रार दिल्याने एक वर्षाचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. दोघांनाही प्रत्येक 17 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. आरुषी- हेमराज दुहेरी हत्याकांडाला 'दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण' मानता येणार नसल्याचे कोर्टाने यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे सीबीआयने केलेली फाशीच्या शिक्षेची मागणी कोर्टाने अमान्य ठरवली. तलवार दांपत्याविरुद्ध 15 महिने याप्रकरणाची सुनावणी झाली. तलवार दांपत्यावरच मुलीची आणि नोकर हेमराजची हत्या केल्याचा आरोप होता. कोर्टाने तलवार दाम्पत्याला दोषी ठरवले तेव्हा त्यांना रडू कोसळले. कोर्टाने निर्णय दिल्यानंतर पोलिसांनी तलवार दाम्पत्याला ताब्यात घेतले. त्यांना गाझियाबाद येथील तुरुंगात नेण्यात आले. तुरुंगात तलवार दाम्पत्याची अवस्था बिकट झाली होती. नुपूर तलवार यांना अश्रू आवरत नव्हते. त्यांचा रक्तदाबही कमी झाला होता. त्यामुळे तुरुंगातील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. दरम्यान, कोर्टाचा निकाल हा कायद्याला धरून नाही. त्यामुळे हायकोर्टात त्याविरोधात दाद मागितली जाणार असल्याचे बचाव पक्षाचे वकील सत्यकेतू सिंग यांनी सांगितले आहे.