1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 26 जानेवारी 2016 (09:56 IST)

दाऊदवर बक्षीस किती? गृहमंत्रालयच अनभिज्ञ

‘कितना इनाम रखे है रे सरकार हम पर..’ शोले चित्रपटातील गब्बरसिंगच्या या प्रश्नाप्रमाणेच देशातील जनतेला मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम बाबतीत असाच प्रश्न पडला आहे. गब्बरच्या प्रश्नावर त्याच्या साथीदारांनी ‘पुरे 50 हजार’ असे उत्तर दिले होते. पण देशातील जनतेने विचारलेल्या दाऊदबाबतच्या प्रश्नावर खुद्द केंद्रीय गृहमंत्रालयाने ‘पता नही’असे धक्कादायक उत्तर दिले आहे.
 
दाऊद इब्राहीम याच्यावर किती रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे, याची माहिती खुद्द केंद्रीय गृहमंत्रालयाला नसल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. केवळ दाऊद नव्हे तर देशाला हवे असणारे अन्य मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांवर किती बक्षीस ठेवण्यात आले आहे, याबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे खुद्द गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
 
माहितीच्या अधिकाराखाली लघु चित्रपटाचे निर्माते उल्हास पी. रेवंकर यांनी गृह मंत्रालयाकडे अर्ज केला होता. रेवंकर यांनी केलेल्या अर्जात देशाला हवे असणार्‍या दहशतवाद्यांवर किती रुपयांचे बक्षीस ठेवले आहे? कोणत्या दहशतवाद्यावर सर्वात जास्त बक्षीस ठेवले आहे? असे प्रश्न विचारले होते. मात्र, यावर मंत्रालयाने ‘कोणताही माहिती उपलब्ध नाही’, असे अजब उत्तर दिले आहे. गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या या उत्तरानंतर मुख्य माहिती अधिकार्‍यांकडे अर्ज केला. मात्र त्यांच्याकडून देखील कोणतेही उत्तर मिळाले नाही.