शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

भारताच्या शेजारी दहशतवादाची जन्मभूमी: मोदी

पणजी- दहशतवादाचा पुरवठा करणारा देश भारताचा शेजारी आहे. पाकिस्तान हा आमचा शेजारी देश जागतिक दहशतवादाची जन्मभूमी आहे, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लाबोल केला असून, यासाठी पुरविण्यात येणारा पैसा व शस्त्रास्त्रांवर पद्धतशीरपणे नियंत्रण मिळविण्यासह प्रशिक्षण व राजकीय पाठिंबा देणार्‍यांविरुद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्णायक कारवाई करण्याची गरज व्यक्त केली.
 
दहशतवादामुळे आमच्या भागाची शांतता, सुरक्षा व विकासाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. दुर्दैवाने दहशतवादाची जन्मभूमी भारताच्या शेजारी आहे. जगाच्या कानाकोपर्‍यात असलेल्या दहशतवादी मॉड्युल्सचे तार या देशाशी जोडले जातात, असे मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, ब्राझीलचे अध्यक्ष मायकेल तीमेर, रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा यांच्या उपस्थितीत बोलताना सांगितले.
 
दहशतवादाला देण्यात येणारा प्रतिसाद हा सर्वसमावेशकच असावा आणि देशांनी वैयक्तिक स्तरासह सामूहिकपणे याचा मुकाबला केला पाहिजे, असे आवाहन मोदींनी केले. दहशतवादी हल्ले करणार्‍या व्यक्ती किंवा संघटनांवर कारवाई करताना अपराध हाच एकमेव आधार असला पाहिजे. दहशतवाद्यांना पुरविण्यात येणारा पैसा, शस्त्रास्त्रांचा पुरवठा, प्रशिक्षण आणि राजकीय पाठिंबा, या सगळ्या गोष्टींना पद्धतशीरपणे पायबंद घातला पाहिजे. आंतरराष्ट्रीय दहशतवादाबाबत सर्वसमावेशक कारवाईच्या मसुद्याला लवकरात लवकर मान्यता देऊन दहशतवादाविरुद्धच्या लढाईबाबत आपण प्रामाणिक असल्याचे दाखवून देण्याची वेळ आली आहे, असेही मोदी म्हणाले.
 
आज आम्ही ज्या जगात वावरत आहोत त्यामध्ये आमच्या नागरिकांचे जीवन सुरक्षित करायचे असेल, तर सुरक्षा आणि दहशतवादविरोधी कारवाईमध्ये सहकार्याची नितांत गरज आहे. आमचा विकास आणि आर्थिक भरभराटीवर दहशतवादरूपी राक्षसाची गडद छाया पडली आहे. दहशतवादाने आता जगाच्या कानाकोपर्‍याला आपल्या कवेत घेतले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासह दहशतवाद दिवसेंदिवस घातक होत आहे. त्यामुळे दहशतवादाला आमचे प्रत्युत्तर हे सर्वसमावेशकच असले पाहिजे, असेही मोदी म्हणाले.
 
वैयक्तिक अतिरेकी आणि संघटनांविरुद्ध कारवाईच्या वेळी निवडक भूमिका घेतल्याने साध्य तर काहीच होत नाही, परंतु त्याचा तोटाच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विषयावर कृत्रिम आणि स्वहित साधण्याच्या हेतूने फरक करता कामा नये, या शब्दांत मोदींनी चीनला अप्रत्यक्ष टोला लगावला. यादृष्टीने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये सुरक्षाविषयक सहकार्य वाढविण्याची गरज आहे, असेही मोदी म्हणाले.