बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By भाषा|
Last Modified: अकोला , मंगळवार, 7 सप्टेंबर 2010 (11:18 IST)

राहुल गांधी आज अकोल्यात!

ND
काँग्रेस सरचिटणीस, खासदार राहुल गांधी मंगळवारी अकोल्याच्या दौर्‍यावर येत आहेत. त्यांचा हा दौरा पूर्णपणे गैरराजकीय असून, ते केवळ विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या दौर्‍याच्या निमित्ताने शिवणी विमानतळ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

खा. राहुल गांधी यांचे मंगळवारी सकाळी १०.५० वाजता शिवणी विमानतळावर आगमन होईल. ते ११ वाजता कृषी विद्यापीठातील के. आर. ठाकरे सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. बरोबर एक तास संवाद साधल्यानंतर १२ वाजता ते विमानतळाकडे रवाना होतील व तेथून औरंगाबादला प्रयाण करतील. गांधींच्या या अवघ्या एक तासाच्या दौर्‍यानिमित्ताने प्रशासन ढवळून निघाले आहे. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी)चे ११ अधिकारी गेल्या तीन दिवसांपासून अकोल्यात मुक्काम ठोकून आहेत. अन्य पाच अधिकार्‍यांचाही त्यात समावेश आहे. अकोल्याचे पालकमंत्री सुभाष झनक आणि ना. नीतीन राऊत यांनी सोमवारी दिवसभर कृषी विद्यापीठात बैठक घेऊन, पूर्वतयारीचा आढावा घेतला. पोलिसांनीही रंगीत तालीम करून सर्वांना सज्ज ठेवले आहे. अधिकारी आणि कर्मचार्‍यांमुळे विमानतळ आणि कृषी विद्यापीठाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. स्थानिक पोलिस व विभागातील इतर जिल्ह्यातील पोलिसही या बंदोबस्तात सहभागी राहणार आहेत.