गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: किल्लारी , गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (08:56 IST)

किल्लारी भूकंपाची 28 वर्षे

30 सप्टेंबर 1993 च्या महाप्रलयंकरी भूकंपाला आज गुरुवारी  (ता. 30) 28 वर्षे पूर्ण झाली. पहाटे तीन वाजून 56 मिनिटाला किल्लारी आणि परिसरातील बावन्न गावांत 6.4 रिश्‍टर स्केलच्या भूकंपाने कोणाची आई, कोणाचे वडील, पती, पत्नी, भाऊ, बहीण, मुले हिरावली. क्षणार्धात सर्वकाही होत्याचं नव्हतं झालं.
 
 भूकंप होऊन 28  वर्षे लोटले. नवी पिढी कर्ती धर्ती झाली. तरीही किल्लारी आणि परिसरातील ग्रामस्थांच्या मनातून भूकंप घर करून आहे. त्याला कारण त्या आघाताच्या स्मृतींना रोज उजाळा मिळेल, अशीच व्यवस्था तिथे करून ठेवली आहे. नवी गावे वसवताना सरकारी पद्धतीने ठोकळेबाज उत्तरे शोधली गेली. सरकारी पद्धतीनेच ती थोपली गेली. त्यामुळे तिथे घरांऐवजी उभे राहिले चार भिंतींचे खोके. घरपण नसेल तर गावपण कुठून येणार? त्यामुळे पुनर्वसित गावे म्हणजे खोक्यांनी भरलेले कंटेनर बनले आहेत. अनेक गावांना ना रस्ते बनले ना पाणी मिळाले. पुनर्वसित घरांचीही दुरवस्था झाली आहे. अर्थात, यंत्रणेसह इथल्या लोकांची मानसिकताही त्याला कारण आहेच.
 
भूकंपाच्या 28 वर्षांनंतरही गावांतर्गत रस्ता मुरूम व मातीचा आहे तोच आहे. पुनर्वसनात शेकडो किलोमीटरचा रस्ता खडक, मुरूम मातीचा बनविलेला होता. त्यावर अद्याप डांबरीकरण झालेले नाही. गावांतर्गत मुख्य रस्तेही मुरूम आणि खडकाचे आहेत. आज त्यावर चालणेही कठीण आहे. 
 
आज ही या भागातील शासकीय रुग्णालयांतील आरोग्य सुविधा अपुरी असून, त्यात सुधारणा होणे अपेक्षित आहे. भूकंपग्रस्तांना आठव्या आणि नवव्या फेरीतील कबाल्यांचा प्रश्न तसेच नोकरीतील अनुशेष हा प्रमुख मुद्दा आज शासनाने प्राधान्याने सोडविणे गरजेचे आहे.