अभाविप विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करते
अभाविप विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करत आहे, त्यामुळे अभाविपवर तात्काळ बंदी आणावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या तरूण कार्यकर्त्यांनी आज आझाद मैदान परिसरात अभाविपविरोधात निदर्शने केली. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष अदिती नलावडे, विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई कार्याध्यक्ष अमित तिवारी, अल्पसंख्याक विभागाचे मुंबई अध्यक्ष सुहेल सुभेदार, युवती काँग्रेसच्या पुजा देसाई, कोमल फडतरे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
गुरमेहर कौर प्रकरणावरून संपूर्ण देशभरात अभाविपविरोधात आंदोलन पुकारले जात आहे. एकीएकडे बेटी बचाओ-बेटी पढाओ, स्टँड अप इंडिया, असे नारे द्यायचे आणि दुसरीकडे एखाद्या मुद्द्यावर आवाज उठवणाऱ्या मुलींना बलात्काराची धमकी देणाऱ्या संघटनेला पोसायचं, असा कार्यक्रम सध्या देशात सुरु असल्याची टीका अदिती नलावडे यांनी यावेळी केली. आपल्या देशात लोकशाही असल्याने प्रत्येकाला आपले मत प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे गुरमेहर कौरला चुकीचे ठरवणे अयोग्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून गुरमेहर कौरला ट्रोल करणाऱ्या सेलिब्रिटीज आणि मंत्र्यांचाही त्यांनी निषेध केला.