शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 9 जुलै 2023 (17:51 IST)

अहमदाबाद :गरोदर असतानाही ती तंबाखू खायची, जन्मलेल्या बाळाचा रंग निळा पडला, पण अखेर डॉक्टरांनी वाचवलंच

baby legs
“जन्मल्यानंतर बाळ रडतच नव्हतं. डॉक्टरांनी सगळ्या गोष्टी तपासून पाहिल्या. पण नेमकं कारण स्पष्ट होत नव्हतं. तेव्हा आम्ही आईची प्रकृती आणि तिच्या सवयींबाबत विचारलं. तिला तंबाखूचं व्यसन असल्याचं आम्हाला समजलं. आम्ही ताबडतोब जन्मलेल्या बाळावर निकोटिन चाचणी केली. त्यानंतर समोर आलेल्या माहितीने आम्हीही हादरलो.”
 
अहमदाबाद येथील ज्येष्ठ डॉक्टर आशिष मेहता हे बीबीसीला या प्रकरणाची माहिती देत होते.
 
मेहसाणातील एका खासगी रुग्णालयात 20 जून रोजी एका मुलाचा जन्म झाला होता. सिझेरियन पद्धतीने जन्मलेलं हे बाळ सुरुवातीला निरोगी वाटलं. त्याचं वजनही 2.4 किलो इतकं नोंदवण्यात आलं होतं.
 
पण जन्मानंतर बाळ रडलं नाही, काही वेळाने त्याच्या त्वचेचा रंगही निळा पडायला लागला. हे पाहून डॉक्टरांनी त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं.
 
उपचारादरम्यान, बाळाचे हृदयाचे ठोकेही योग्य दराने होत नव्हते. तसंच त्याच्या रक्तदाबात घट झाल्याचं डॉक्टरांना आढळून आलं.
 
अखेर, खबरदारी म्हणून मेहसाणातील रुग्णालयाने बाळाला अहमदाबादमध्ये डॉ. मेहता यांच्या रुग्णालयात हलवलं.
 
मेहता यांच्या रुग्णालयात बाळावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले. तपासणीनंतर बाळाच्या रक्तात मोठ्या प्रमाणात निकोटिन आढळून आलं.
 
जन्मावेळीच बाळाच्या रक्तातील निकोटिनचं प्रमाण हे प्रति मिलीलीटरमागे 60 मिलिग्रॅम (mg/ml) इतकं होतं.
 
हे प्रमाण म्हणजे एका प्रौढ व्यक्तीच्या रक्तातील निकोटिनच्या प्रमाणापेक्षा 20 पट जास्त आहे.
 
डॉ. आशिष मेहता यांनी संबंधित अहवालाच्या आधारावर उपचार सुरू केले.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, “जन्मावेळी बाळ रडलं नव्हतं. अशाप्रकारे न रडण्यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात. साधारणपणे असा प्रकार अस्फिक्सिया नामक विकारामुळे होतो. यामध्ये बाळाला श्वास घेण्यात अडचणी येत असतात. पण या प्रकरणात मात्र असं काही नव्हतं.
 
विशेष, म्हणजे संपूर्ण गरोदरपणात आईला कोणताच त्रास नव्हता. पुढे जन्माच्या तीन दिवस आधी बाळाची हालचाल मंदावली होती. त्यामुळे या महिलेची प्रसूती सिझेरियन पद्धतीने करण्यात आली होती. आईचा वैद्यकीय इतिहास तपासण्यात आला. त्यानंतर आम्हाला आईच्या तंबाखूच्या व्यसनाबाबत माहिती मिळाली.”
 
संबंधित महिलेला तंबाखूचं प्रचंड व्यसन होतं. ती एका दिवसात 15 तंबाखू पुड्या खायची. ही माहिती मिळताच आम्ही बाळावर तत्काळ निकोटिन चाचणी केली. या चाचणीचा अहवाल पाहिल्यानंतर आम्हालाही मोठा धक्का बसला. कारण तंबाखूचं व्यसन असलेल्या एका प्रौढ व्यक्तीच्या रक्तातील निकोटिनचं प्रमाण हे साधारणपणे 0.3 ते 3 mg/ml इतकं असू शकतं. पण बाळाच्या बाबतीत हे प्रमाण 60 mg/ml इतकं होतं.”
 
बाळाचे प्राण कसे वाचवले?
निकोटिनच्या प्रमाणाबाबत माहिती मिळाल्यानंतर बाळावर तत्काळ त्याच्यानुसार उपचार सुरू करण्यात आले.
 
याविषयी माहिती देताना डॉ. मेहता यांनी सांगितलं, “आम्ही त्याला व्हेंटीलेटर सपोर्ट सिस्टिमवरच ठेवलेलं होतं. त्यानंतर त्याच्या शरीरातील निकोटिन मूत्रमार्गाने बाहेर काढण्यासाठी आम्ही उपचार सुरू केले. पाच दिवसांच्या उपचारानंतर बाळाची प्रकृती सुधारली. आता त्याला डिस्चार्ज देऊन घरीही पाठवण्यात आलं आहे.
 
गरोदरपणात आईने तंबाखू सेवन केलेलं असल्यास त्याचे परिणाम बाळावर दिसणं हे स्वाभाविक आहे. आता बाळाला त्याच्या आईने दूध द्यायला हवं की नको, या प्रश्नाचं उत्तर देताना डॉ. मेहतांनी म्हटलं, “आम्ही बाळाच्या आईला स्तनपान देण्याचा सल्ला दिला आहे. कारण आईच्या दुधामुळे बाळाची प्रतिकारशक्ती सुधारते. निकोटिनचं प्रमाण कमी होण्यासाठीही त्यातून मदत होईल.”
 
पण आता यापुढे तंबाखू सेवन न करण्याची सूचना आईला करण्यात आली आहे. अशा प्रकारे गरोदरपणात दुर्लक्ष केलं, तर मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं, असंही त्यांनी सांगितलं.
 
डॉ. मेहता यांनी यापूर्वी उपचार केलेल्या एका प्रकरणाबाबत यावेळी माहिती दिली.
 
ते म्हणतात, “अशी प्रकरणे सातत्याने समोर येत असतात. गेल्या वर्षीच माझ्याकडे एक महिला उपचारासाठी आली होती. संबंधित महिला गरोदरपणात आपल्या कुटुंबीयांना कोणतीही माहिती न देता नैराश्यावरच्या औषधांचं सेवन करायची. या औषधांचा दुष्परिणाम तिच्या बाळावर दिसून आला होता.”
 
डॉ. मेहता म्हणाले, “गरोदरपणात आणि प्रसूतीपश्चातही महिलांनी आपल्या खाण्यापिण्याबाबत काळजी घेणं आवश्यक असतं. स्तनपान देणाऱ्या महिलांनी तंबाखू, नैराश्यावरील औषधे, मद्यपान आणि धुम्रपान यांसारख्या गोष्टी टाळायला हव्यात. तुम्हाला हे थांबवणं शक्य नसेल, तर किमान सेवनाचं प्रमाण कमी तरी करायला पाहिजे.”
 
निकोटिनग्रस्त बाळाची प्रकृती सुधारल्यानंतर त्याची रवानगी पुन्हा मेहसाणाला करण्यात आली.
 
बाळाचे काका मोहित पटेल (बदललेलं नाव) यांच्याशी बीबीसीने चर्चा केली. ते म्हणतात, “बाळाच्या जन्मामुळे आमच्या घरात आनंद पसरला होता. पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. अहमदाबादमध्ये उपचार घेतल्यानंतर बाळ सुदैवाने सुखरूप आहे.
 
बाळंतपणापर्यंत आमच्या वहिनींना तंबाखूचं व्यसन होतं, हे आम्हाला माहिती नव्हतं. पण त्यांनी आता चूक मान्य केली आहे. आता आमच्या वहिनींनी ताबडतोब तंबाखूचं व्यसन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
 
या प्रकरणामुळे आम्हाला आयुष्याचा धडा मिळाला. आमच्या बाबतीत जे घडलं ते इतर कुणाबाबत घडू नये, यासाठी आम्ही याची माहिती सर्वांना देऊन त्यांना व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देत आहोत.
 



Published By- Priya Dixit